Cancer Vaccine: महाराष्ट्रासह देशभरात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. खासकरुन महिलांमधील काही कॅन्सरचं प्रमाणही धोकादायकरित्या वाढतंय. मात्र अशा कॅन्सररुग्णांना लवकरच दिलासा मिळणाराय. कारण कॅन्सर प्रतिबंधक लस पुढच्या 6 महिन्यात उपलब्ध होऊ शकते.. केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच याची माहिती दिलीय.
देशातच नाही तर संपूर्ण जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढत चाललेत. सर्वत्र विविध प्रकारच्या कॅन्सरचा विळखा वाढत चाललाय. त्यात आता एक दिलासादायक बातमी समोर येतेय. येत्या 6 महिन्यात कॅन्सर प्रतिबंधक लस बाजारात येऊ शकते. कर्करोगावर नवीन लस संशोधन अंतिम टप्प्यात असून त्याची मानवी चाचणी सुरू झाल्याची माहिती आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलीय. येत्या सात-आठ महिन्यांत लसीचं काम पूर्ण झाल्यानंतर ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा प्रतापराव जाधवांनी केलाय. भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वाढत चाललीय त्याची भीतीदायक आकडेवारी ICMR कडून समोर येतेय.
भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या 25 लाखांच्या वर आहे. कॅन्सरमुळे भारतात दर 8 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो. दरवर्षी नव्याने नोंदणी होणाऱ्या कॅन्सर रुग्णांची संख्या 7 लाखाच्या वर असते. कॅन्सर संबंधित मृत्यूंची संख्या 5 लाख 56 हजार इतकी आहे. स्तनाच्या कॅन्सरनं त्रस्त जगभरातल्या प्रत्येक 2 महिलांमागे 1 महिला भारतातील असते. भारतात दर दिवशी 2500 जणांचा तंबाखू संबंधित कॅन्सरनं मृत्यू होतो. 5 पैकी एका पुरुषाचा, 20 पैकी एका महिलेचा मृत्यू धुम्रपानामुळे होतो. 2010 साली धुम्रपानामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 9 लाख 30 हजार इतकी होती.
पुरुषांमध्ये तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर तर महिलांमध्ये गर्भाशय आणि स्तनाचा कॅन्सर होतो.हा वाढता धोका लक्षात घेता आणि केंद्र आणि राज्य पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाताहेत. जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू करणार, रोग निदान पहिल्याच टप्प्यात कळले तर उपचार करणे सोपे होईल अशी माहितीही प्रतापराव जाधावांनी दिलीय.
इतकंच नाही तर कॅन्सरवरील औषध निर्मिती आणि काही औषधांवरील सीमा शुल्काबाबतही केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती जाधवांनी दिलीय. औषध देशात निर्माण करण्याचे काम होत आहे. सीमा शुल्क अधिक लागणारी औषध देशात तयार होत आहेत तर 36 औषधी त्यांचा शुल्क कमी करण्याचे काम सरकारने केले आहे. औषधी स्वस्त करण्याचे काम केले जात आहेत. 13 नवीन योजना सुरू केल्या जात आहेत ज्याने रुग्णांना दिलासा मिळेल. इ संजीवनी मधून उपचार साठी मदत होईल त्यासाठी गावागावात ब्रॉडबँड देण्याचे काम सुरू होत आहेत.
कॅन्सरचं नाव जरी ऐकलं तरी काळजात धस्स होतं. मात्र त्याच कॅन्सरला रोखण्यासाठी आता 6 महिन्यात लस उपलब्ध होणाराय. त्यामुळं कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळू शकतो. ही लस आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती आणेल ही अपेक्षा.