Shivaji Sawant on Chhava: बॉलिवूडमध्ये सध्या फक्त 'छावा' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या संघर्षमय जीवनावर आधारित असलेल्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणलं आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असणारा 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने संभाजीराजेंचा ज्वलंत इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांना मिळत आहे. दरम्यान यानिमित्ताने संभाजीराजेंच्या आयुष्यावर आधारित 'छावा' कादंबरीही चर्चेत आली आहे.
'छावा' ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. या कादंबरीतून छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. शिवाजी सावंत यांनी सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत ही कादंबरी लिहिण्याआधीचा एक किस्सा सांगितला होता. त्याआधी शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या आयुष्यावर लिहिलेली 'मृत्यूंजय' कादंबरी प्रचंड गाजली होती.
शिवाजी सावंत यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं की, "छावाच्या बाबतीत आचार्य अत्रे यांच्याशी झालेला संवाद कायमचा माझ्या लक्षात राहिला. कार्यक्रम संपल्यानंतर चहा घेत असताना आचार्य अत्रे यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने विचारलं की, शिवाजीरावर तुम्ही संभाजीराजेंवर कादंबरी लिहित आहात. म्हणजे या कादंबरीत तुम्ही जसा मृत्यूंजयमध्ये कर्ण मोठा केला तसं या कादंबरीतून तुम्ही संभाजीराजेंना शिवाजी राजेंपेक्षा मोठे करणार का काय?".
"मी थोडा वेळ चक्रावलो, गोंधळलो आणि नंतर त्यांना हसत उत्तर दिलं, आचार्य माझ्या कादंबरीचं नाव छावा आहे. म्हणजे या कथानायकाचे पिताजी सिंह होते हे नावातूनच सिद्ध होत नाही का? त्यावर ते गदगदून हसले आणि समोरुन एक द्राक्ष उचलून माझ्या हातात दिलं," असा किस्सा त्यांनी सांगितला.
सैकनिल्क रिपोर्टनुसार, 'छावा'ने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 24.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर सिनेमाची एकूण कमाई आता 165 कोटी इतकी झाली आहे. फक्त देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात छावाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं आत्तापर्यंत सिनेमाने 230 कोटींचा आकडा पार केला आहे. 2025मधील आत्तापर्यंत सर्वाधीक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
छावा' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण लवकरच छावा सिनेमा मराठीतही प्रदर्शित होऊ शकतो, तसे संकेतच मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज "छावा" चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. "छावा" चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकर उपस्थित होते.