'बाबाने आईला असं मारलं,' मुलीने चित्र काढून दाखवलं; आजी-आजोबांसह पोलीसही हादरले; एका क्षणात बापाचं बिंग फुटलं

चार वर्षाच्या मुलीने पेन्सिल आणि कागद घेऊन चित्र काढलं तेव्हा पोलीसही आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. तिने कदाचित पहिल्यांदाच असं चित्र काढलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 07:17 PM IST
'बाबाने आईला असं मारलं,' मुलीने चित्र काढून दाखवलं; आजी-आजोबांसह पोलीसही हादरले; एका क्षणात बापाचं बिंग फुटलं title=

पती जेव्हा पत्नीची हत्या करत होता तेव्हा त्यांची चार वर्षांची मुलगी आपल्या डोळ्यांसमोर हे सर्व घडताना पाहत होती. घाबरलेली मुलगी हे सर्व शांतपणे पाहत होती. वडिलांनी आईला ठार केल्यानंतर तिच्या गळ्यात दोरी टाकून नंतर छताला लटकवल्याचंही तिने पाहिलं. मुलीचा बाप पोलिसांनी पत्नीने आत्महत्या केल्याची खोटी माहिती देतो. पण नंतर ती चार वर्षांची चिमुरडी एक चित्र काढते आणि त्यानंतर या हत्याकांडाचं सगळं सत्य समोर येतं. 

मुलीने चित्र काढताना त्यामध्ये आईचे दोन हात काढले होते. यावेळी एक हात आईच्या गळ्याजवळ येताना दाखवलं होतं. हा तिसरा हात तिने आपल्या वडिलांचा काढला होता. तिच्या वडिलांनी आईचा गळा दाबून हत्या केल्याचं दाखवण्याचा प्रयत्न ती करत होती. हे सर्व तिने आपल्या डोळ्यादेखत पाहिलं होतं. मुलीने काढलेल्या चित्रामुळे बापाचं बिंग फुटलं आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या हत्येला आत्महत्येचं रुप देण्याचा त्याचा प्रयत्नही फसला. 

वडिलांना अटक झाल्याने मुलीलाच आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. हे पाहिल्यानंतर तिथे उपस्थित सर्वजण हळहळले होते. आरोपी पित्याचं नाव संदीप बुधौलिया असून तो झाशीचा रहिवाशी आहे. तो एका औषधांच्या कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतो.

27 फेब्रुवारी 2019 ला सोनाली आणि संदीपचं लग्न झालं होतं. सोनाली मध्य प्रदेशच्या टीकमगढ जिल्ह्याची रहिवासी होती. लग्नाच्या वेळी सोनालीच्या वडिलांनी हुंड्यात 20 लाख रुपये दिले होते. पण संदीपला गाडीदेखील हवी होती. यामुळे लग्नानंतर सासरच्यांनी सोनालीचा छळ करण्यास सुरुवात केली. तीन वर्षं कसेबसे सरल्यानंतर अखेर सोनालीने एका मुलीला जन्म दिला, जी आज चार वर्षाची आहे. 

14 फेब्रुवारीला सोनालीच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. सोनाली आपल्या मुलीसह 12 फेब्रुवारीला लग्नात गेली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारीला संदीपने सोनालीला फोन करुन तात्काळ घरी ये, अन्यथा कधीच येऊ नको असं सांगितलं. पतीने धमकावल्याने सोनाली 16 फेब्रुवारीलाच घरी पोहोचली. 17 फेब्रुवारीला सकाळी संदीपने सासरी फोन करुन सोनालीने आत्महत्या केल्याचं सांगितलं. 

सोनालीचे आई-वडील आले असता संदीपने त्यांनाही सोनालीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगितलं. तसंच पोलिसांनाही हीच कहाणी सांगितली. दरम्यान आपल्या आजी-आजोबांच्या घरी येताच मुलीने त्यांना सगळा घटनाक्रम सांगितला. हे सांगताना तिने पेपर आणि पेन्सिल उचलून चित्र काढलं. हे चित्र पाहिल्यानंतर सगळं सत्य उघड झालं. यानंतर मुलीच्या आजी-आजोबा आणि नातेवाईकांनी पोलिसांना फोन करुन सर्व सांगितलं. 

शवविच्छेदन अहवालातही गळफासाआधी तिच्या शरिरावर जखमा असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी पुन्हा मुलीकडे चौकशी केली. तिने ते चित्र दाखवत जे पाहिलं होतं ते सर्व सांगितलं. यानंतर पोलिसांनी संदीपला अटक केली. त्याच्यासह कुटुंबीयांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 

प्राथमिक तपासानुसार, 16 फेब्रुवारीच्या रात्री संदीपने सोनालीला बेदम मारहाण केली होती. यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्येला आत्महत्येचा रंग देण्यासाठी त्याने मृतदेह पंख्याला लटकवला. त्यावेळी संदीपला वाटले की आपली चार वर्षांची मुलगी झोपली आहे, पण ही निरागस घाबरलेली मुलगी सर्व काही आपल्या डोळ्यांनी पाहत होती. आणि तिने जे काही दिसले ते या कागदावर उतरवलं.