चित्रपटाआधी 25 मिनिटं जाहिराती दाखवल्या; कोर्टाने PVR-INOX दिला दणका, म्हणाले 'तुम्हाला प्रेक्षकांच्या वेळेचा...'; ठोठावला दंड

ग्राहक न्यायालयाने वेळ म्हणजे पैसा आहे असं सांगत पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्सला दंड ठोठावला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 06:28 PM IST
चित्रपटाआधी 25 मिनिटं जाहिराती दाखवल्या; कोर्टाने PVR-INOX दिला दणका, म्हणाले 'तुम्हाला प्रेक्षकांच्या वेळेचा...'; ठोठावला दंड title=

चित्रपट दाखवण्याआधी 25 मिनिटं लांब जाहिराती दाखवत माझा वेळ वाया घालवला अशी तक्रार एक प्रेक्षकाने पीव्हीआर सिनेमाज (PVR Cinemas), आयनॉक्स (INOX) आणि बूकमायशोला (BookMyShow) ग्राहक कोर्टात खेचलं. आपल्याला यामुळे मानसिक त्रास झाल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं होतं. विशेष म्हणजे कोर्टाने त्याची तक्रार मान्य करुन घेत त्याला 65 हजारांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. 

आपल्या तक्रारीत अभिषेक एमआरने आरोप केला आहे की, 2023 मध्ये त्याने 4.05 च्या शोसाठी 'सॅम बहादूर' चित्रपटाची तीन तिकिटं बुक केली होती. त्याने दावा केला की, चित्रपट संध्याकाळी 6.30 पर्यंत संपणार होता आणि त्यानंतर त्याने आपल्या कामावर परत जाण्याची योजना आखली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चित्रपटाच्या जाहिराती आणि ट्रेलर दाखवल्यानंतर 4.30 वाजता चित्रपट सुरू झाला, ज्यामुळे जवळपास 30 मिनिटं वाया गेली. 

तक्रारीत पुढे सांगण्यात आलं आहे की, तक्रारदार यामुळे इतर नियोजित योजनांमध्ये तसंच भेटींमध्ये सहभागी होऊ शकला नाही. त्याचं जे नुकसान झालं आहे ते पैशात मोजलं जाऊ शकत नाही". 

माझ्या अमूल्य वेळेचा गैरफायदा घेण्यात आला. तसंच हे स्पष्टपणे अनुचित व्यापार प्रथा आहे, कारण त्यांनी जाहिराती दाखवत अवाजवी फायदा घेतला आणि शोच्या चुकीच्या वेळा दिल्या असाही आरोप त्याने केला आहे. 

ग्राहक न्यायालयाने, "वेळ हा पैसा मानला जातो" असं ठासून सांगत PVR सिनेमा आणि INOX यांना तक्रारदाराला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचे निर्देश दिले. PVR आणि INOX ला अनुचित व्यापार प्रॅक्टिस आणि तक्रारकर्त्याचा वेळ वाया घालवल्याबद्दल 50 हजार, मानसिक त्रासासाठी 5000 आणि तक्रार दाखल करण्यासाठी आणि इतर सवलतींसाठी 10 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले. कोर्टाने पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्सला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

दरम्यान कोर्टाने बूकमायशोला ग्राह्य धरण्यास नकार दिला कारण ते फक्त तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असून त्यांचं जाहिरातींच्या स्ट्रिमिंगवर कोणतंही नियंत्रण नाही.

ग्राहक न्यायालयाने काय म्हटलं?

न्यायालयाने 15 फेब्रुवारीच्या आपल्या आदेशात म्हटलं आहे की, "कोणालाही इतरांच्या वेळेचा आणि पैशाचा फायदा घेण्याचा अधिकार नाही". चित्रपटगृहात निष्क्रिय बसून जे दाखवलं जाईल ते 25 ते 30 मिनिटं पाहणं म्हणजे कमी नाही असंही त्यांनी सांगितलं. 

"व्यग्र वेळापत्रक असलेल्या लोकांसाठी अनावश्यक जाहिराती पाहणं खूप कठीण आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

PVR-INOX ने काय बाजू मांडली?

आपला बचाव करताना PVR Cinemas आणि INOX यांनी जागरूकता पसरवण्यासाठी कायद्यानुसार काही सार्वजनिक सेवा घोषणा (PSA) प्रदर्शित करणं बंधनकारक असल्याचे सांगितले. दरम्यान कोर्टाने चित्रपट सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटांच्या आत आणि मध्यांतर कालावधीत त्या प्रदर्शित केल्या जाव्यात हे स्पष्ट केलं आहे. 

न्यायालयाने पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्स यांना ग्राहक कल्याण निधीमध्ये एक लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना ऑर्डरच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत रक्कम भरण्यास सांगितलं जातं.