बॉक्स ऑफिसवर सध्या 'छावा' चित्रपटाने आपला दबदबा निर्माण केला असून, प्रेक्षकांच्या मनावरही गारुड घातलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर पडलेले अनेक प्रेक्षक डोळ्यातील अश्रू पुसत भावूक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहून अनेकांचा ऊर भरुन आला असून, अभिनेता विकी कौशलवरही स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे छावा चित्रपट पाहिल्यानंतर भावूक आणि संतप्त झालेल्यांवर निशाणा साधला आहे.
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन झालेल्या मृत्यूंचा दाखला देत तिने आपली खंत व्यक्त केली आहे. 500 वर्षांपूर्वीच्या हिंदूंच्या फिल्मी आणि अर्धवट काल्पनिक छळामुळे अधिक संतप्त झाला असेल तर तो मन आणि आत्म्याने मेला आहे असं सांगत तिने याची तुलना महाकुंभमधील मृत्यूंशी केली आहे.
"एक समाज जो चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनामुळे तसंच कथितपणे जेसीबीने मृतदेह हाताळले त्याऐवजी 500 वर्षांपूर्वीच्या हिंदूंच्या फिल्मी आणि अर्धवट काल्पनिक छळामुळे अधिक संतप्त झाला असेल तर तो मनाने आणि आत्म्याने मेला आहे," असं स्वरा भास्करने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
स्वरा भास्करच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटलं आहे की, जर संपूर्ण खरा छळ दाखवला असता तर सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला असता असं सुनावलं आहे. काहींनी तिच्या भूमिका ठराविक असतात अशी कमेंट केली आहे. तर काहींनी तुझी मानसिक स्थिती खराब झाली असल्याचं सुनावलं आहे.
सैकनिल्क रिपोर्टनुसार, 'छावा'ने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 24.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर सिनेमाची एकूण कमाई आता 165 कोटी इतकी झाली आहे. फक्त देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात छावाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं आत्तापर्यंत सिनेमाने 230 कोटींचा आकडा पार केला आहे. 2025मधील आत्तापर्यंत सर्वाधीक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
छावा' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण लवकरच छावा सिनेमा मराठीतही प्रदर्शित होऊ शकतो, तसे संकेतच मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज "छावा" चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. "छावा" चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकर उपस्थित होते.