राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होणार? रोहित पाटलांनी दिला इशारा, म्हणाले 'आम्ही....'

राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे डान्सबार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे. 

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 09:11 PM IST
राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होणार? रोहित पाटलांनी दिला इशारा, म्हणाले 'आम्ही....' title=

राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे डान्सबार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता. मात्र आयत्या वेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होण्याची शक्यता आहे. डान्सबार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता. मात्र, आयत्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसुद्यात सुधारणा करून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना केल्याचा माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टानं डान्स बारसंदर्भात अलीकडेच काही निर्देश दिले आहेत. त्या आड डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

मात्र कॅबिनेटचा निर्णय लीक झाल्यामुळेच हा प्रस्ताव मांडता आला नाही असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित आर आर पाटील आक्रमक झाले आहेत. डान्सबार पुन्हा सुरू केले तर मैदानात उतरू, असा इशारा रोहित आर आर पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्य सरकारने 2016 साली डान्सबारसंदर्भात एक कायदा केला होता. डान्स बारसंदर्भात नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन डान्स इन हॉटेल्स, रेस्तराँ अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन अॅक्ट 2016 हा नवा कायदा केला होता. या कायद्यात आता काही नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत. 
 

नव्या तरतुदी काय? 

- डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही
- डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारच्या परवानगी संदर्भात ही बदल करणार
- डान्सबार संदर्भात कायदा करताना समितीमध्ये डान्सबारचा प्रतिनिधी असावा
- डान्सबार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बारबाला नको
- बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान 2 मीटरचे अंतर असावं
- ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही
- डान्सबारमध्ये धूम्रपानास मनाई
- बारबालांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं
- बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत

हे बदल कायद्याने केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

2005 साली तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी डान्सबारवर बंदी घातली होती.. 

- 2005 साली तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटलांनी डान्सबारवर बंदी घातली
- वाढती व्यसनाधीनता, वाढती गुन्हेगारी, महिलांचं शोषणामुळे डान्सबार बंदीचा निर्णय
- बंदी घालण्यात आली तेव्हा सरकारी आकड्यांनुसार 800 नोंदणीकृत डान्सबार होते
- मुंबई परिसरात डान्सबारमध्ये काम करणाऱ्या 75 हजार बारबाला होत्या
- डान्सबार मालकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली
- सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवत काही नियम लागू करण्याचे आदेश दिले
- राज्य सरकारने 2016 साली पुन्हा राज्याचा सुधारित कायदा केला

नियमांमध्ये सुधारणा करून आता राज्यात पुन्हा डान्सबार सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र अनेक संसारांची रोखरांगोळी करणाऱे, तरुणांना व्यसनाधीन करणारे डान्सबार पुन्हा सुरू होऊ नयेत अशीच अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.