मुंबई : एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत आणि ती व्यक्ती चित्र रेखाटताना दिसली तर... तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल ना... पण अशा एक नाही तर तब्बल २० चित्रकारांनी रेखाटलेली चित्र एकाच वेळी पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळतेय. हाताने कुंचल्याचे फटकारे मारून कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन आणि त्याचे कौतुक आपण नेहमीच करत आलो. पण, दोन्ही हात नसतानाही कधी ओठांमध्ये किंवा पायाच्या बोटांमध्ये ब्रश पकडून कॅनव्हासवर कल्पनेपलिकडचे विश्व साकारणाऱ्या भारतभरातील २० चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन भांडुपमध्ये लवकरच भरतंय.
भारतभरात एकूण २४ दोन्ही हात नसलेले दिव्यांग चित्रकार आहेत. त्यातील चार चित्रकारांनी अलिकडेच या जगाचा निरोप घेतला. उरलेल्या २० पैंकी तीन कलाकार हे महाराष्ट्रातील आहेत तर एक मुंबईकर आहे. मुंबईकर असलेल्या बंदेनवाज नदाफ या पायाच्या बोटांमध्ये ब्रश पकडून चित्र काढणारा दिव्यांग कलाकाराला थेट प्रात्यक्षिकासहीत पाहता येईल. देशभरातील २० दिव्यांग कलाकारांनी रेखाटलेली ३० सर्वात्तम चित्र या प्रदर्शनात पाहता येईल.
गेली १९ वर्षे कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या भांडुप पूर्व येथील शिवकृपा नगरातील भगवती निवास या बैठ्या चाळीत हे चित्र प्रदर्शन भरतं. शनिवारी म्हणजेच १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांना पाहता येईल.
प्रदर्शन... मग ते कसलेही असो, बहुधा ते शहराच्या ठराविक भागातील बंदिस्त सभागृहात किंवा वातानुकुलीत दालनात आयोजित केले जाते. ते प्रदर्शन पाहण्यासाठी त्या विषयात रुची असणारे रसिकच येतात. पण रोजची धावपळ आणि दगदगीचे आयुष्य जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आवड असूनही किंवा विरंगुळा म्हणून अशा प्रदर्शनांचा आस्वाद घेता येत नाही. म्हणून कांजूर-भांडुपसारख्या कामगार बहुल वस्तीतील श्री गणेश सेवा मंडळ गेली अठरा वर्षे दोन बैठ्या चाळींतील मधल्या मोकळ्या जागेत सामाजिक, सांस्कृतिक आणि कला आदी विषयांवरील छायाचित्र किंवा वस्तूंचे प्रदर्शन तसेच स्वत: तयार केलेल्या माहितीपटांचे आणि लघुपटांचे आयोजन करून तिथल्या सामान्य नागरिकांचे प्रबोधन करत आहे. विशेषत: तेथील विद्यार्थ्यांमध्ये कला आणि सामाजिक भान जागृत करीत आहेत.
१० फूट रुंदी असलेल्या प्रत्येक खोलीचा दरवाजा वगळता उरलेल्या ७ फूट भिंतीवर खिडकी झाकून लाकडी पॅनल्स् तयार करून त्यावर चित्र प्रदर्शन आयोजित केले जाते. सुलेखनकार अच्युत पालव, हवाई छायाचित्रकार स्व.गोपाळ बोधे, गणेशचित्रकार प्रकाश लहाने, मूर्तीकार विशाल शिंदे, स्वाक्षरी संग्रहक सतीश चाफेकर व इतर सुप्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृतीचे प्रदर्शन आजवर ह्या चाळीत मांडले गेले आहे.
'या उत्सवाचं स्वरूप अतिशय साधं असून लोकांकडून कोणतीही वर्गणी न काढता, दिखाऊ-भपकेबाजपणा टाळून स्वत:च्या खर्चाने प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहोत. यंदा भारतभरातील दिव्यांग कलाकारांचे प्रदर्शन आणि एका दिव्यांग कलाकाराचे प्रात्यक्षिक असल्याने सामान्य माणसाचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, अशी आशा आयोजक मंडळाचे खजिनदार निलेश गळंगे यांनी व्यक्त केलीय.