प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : 'पंजाब ऍन्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके'च्या (PMC Bank) गोंधळावर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. पीएमसी बँक घोटाळ्यातील गुन्हेगारांची शिक्षा आम्हाला का? असा सवाल निशिगंधा वाड यांनी केलाय. बँकेतील अनियमिततेसाठी बँकेनं सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये, असं म्हणत निशिगंधा यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, पीएमसी बँकेच्या ग्राहकांना भारतीय रिझर्व्ह बँकेनं मोठा दिलासा दिलाय. डबघाईला आलेल्या पीएमसी बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यातून सहा महिन्यांतून एकदा प्रत्येकी १० हजार रुपये काढता येईल, असा आदेश रिझर्व्ह बँकेनं दिलाय. त्यामुळं जवळपास ६० टक्के गोरगरीब ग्राहकांना आपल्या खात्यातील सर्वच्या सर्व रक्कम काढणं शक्य होऊ शकेल. पीएमसी बँक डबघाईला आल्यानंतर केवळ १ हजार रुपये खात्यातून काढता येतील, असे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले होते. त्यामुळं खातेदारांचे धाबे दणाणले होते.
४९ वर्षीय अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्याबद्दल बोलायचं तर मोठ्या पडद्यापासून दीर्घकाळापासून गायब असलेल्या निशिगंधा वाड या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं लोकांसमोर आल्या होत्या. नुकत्याच एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात निशिगंधा वाड यांची निवड 'गुडविल ऍन्डम्बेसेडर' म्हणून केली होती. तसंच छोट्या पडद्यावरील काही हिंदी मालिकांतही त्यांनी काम केलंय.