Prajakta Mali Phullwanti Movie's Madanmanjiri Song : सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही चांगलीच चर्चेत असते. प्राजक्ता गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी फुलवंती या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाची जेव्हापासून तिनं घोषणा केली, तेव्हापासून तिचे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज झाली आहे. या चित्रपटातील मदनमंजिरी हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात 11 ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.
अशी मी - मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी
अशी मी - मदनमंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी
अशी अतिशय ठसकेबाज शब्दरचना गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांची असून वैशाली माडे यांच्या आवाजानं या गाण्याला चारचांद लागले आहेत. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे तर नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. या गाण्यातला जोश प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचं आहे. त्यामुळे हे गाणे गाताना खूप मजा आल्याचं वैशाली सांगते. प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल. प्राजक्ताच्या नृत्यानं या गाण्याला अजून रंग चढला आहे.
पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत. ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. अविनाश- विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी,प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.