Entertainment News : 90 च्या दशकात प्रदर्शित झालेले असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. रुपेरी पडदा गाजवणाऱ्या कैक कलाकारंनी खऱ्या अर्थानं 90 चं दशक गाजवलं होतं. अशा काळ गाजवणाऱ्या कलाकृतींमधील एक नाव म्हणजे, 'राजा हिंदुस्तानी' (Raja Hindustani). आमिर खान, करिष्मा कपूर आणि सहकलाकारांच्या भूमिका असणारा हा चित्रपट 1996 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासून आजपर्यंत या चित्रपटातील गाणी, दृश्य प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
धर्मेश दर्शन दिग्दर्शित या चित्रपटानं अभिनेत्री करिष्मा कपूरच्या कारकिर्दीला नवी झळाळी दिली. सोबतच या चित्रपटानं आणखी एका अभिनेत्रीलाही लोकप्रिय केलं. ती अभिनेत्री म्हणजे प्रतिभा सिन्हा. 'परदेसी परदेसी...' या गाण्यामुळं प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रतिभा सिन्हानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं खरं, पण गेली 26 वर्ष ही अभिनेत्री फारशी यशस्वी ठरली नाही. ती सध्या काय करते, कुठंय? काही कल्पना आहे?
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेरे महबूब' या चित्रपटापासून प्रतिभानं कारकिर्दीची सुरुवात केली. 13 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ही अभिनेत्री एकाएकी कलाजगतापासून दूर गेली. असं म्हटलं जातं की, प्रतिभा नदीम सैफी नावाच्या संगीत दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली होती, पण नदीम विवाहित होता. ती नदीमच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती की संपूर्ण कारकिर्दच पणाला लावली.
एका मुलाखतीतही तिनं आपण नदीमशी लवकरच लग्न करणार असल्याचं सांगून अनेकांनाच धक्का दिला होता. नंतर मात्र तिनं आपण असं काहीही म्हणालो नव्हतो असं सांगितलं. प्रतिभाची आई, माला सिन्हा यांना जेव्हा मुलीच्या या प्रेमप्रकरणाविषयी कळलं तेव्हा त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. हे प्रकरण पुढे आणखी चिघळलं.
प्रतिभा आणि तिची आई, माला सिन्हा यांच्यामुळं नदीम अडचणीत होता, त्यातच गुलशन कुमार हत्या प्रकरणीसुद्धा त्याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. सरतेशेवटी एका मुलाखतीत आपण विवाहित असून प्रतिभावर प्रेम करत नसल्याचं त्यानं स्पष्टच सांगितलं. पुढे नदीमनं देश सोडला आणि प्रतिभा मात्र भारतात एकटी पडली.
नदीम आणि प्रतिभाच्या नात्याचा शेवट वाईटच झाला. किंबहुना ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं त्याच व्यक्तीनं प्रतिभाची साथ सोडली होती. नात्यांची बदललेली आणि बिघडलेली समीकरणं त्यांच्या या नात्याला मिळालेल्या या नकारात्मक वळणास कारणीभूत ठरली होती.