बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचे त्याचे वडील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्याशी फार ताणलेले संबंध होते हे आता सर्वश्रुत आहे. याचं कारण अनेकदा रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी यावर जाहीरपणे भाष्य केलं आहे. ऋषी कपूर स्पष्टवक्ते असल्याने त्यांनी तर एका कार्यक्रमात रणबीर आमच्यासोबत राहत नाही असं सांगून टाकलं होतं. मात्र वडिलांच्या निधनानंतर रणबीर कपूरला वडिलांची आठवण येत असून निखिल कामतच्या पॉडकास्टमध्ये त्याने आज ते जिवंत असायला हवे होते, जेणेकरुन आम्हाला एकत्रित जास्त वेळ घालवता आलं असता असं म्हटलं आहे.
"माझे वडील पुन्हा परत यावेत जेणेकरुन मला त्यांच्यासह आणखी वेळ घालवता येईल. बोलता येईल, संभाषण साधता येईल अशी इच्छा आहे," असं रणबीर कपूरने म्हटलं. यावेळी त्याने आमच्यात अनेकदा वाद होत असतं, तसंच पटायचं नाही हेदेखील मान्य केलं. ऋषी कपूर यांनी अनेकदा रणबीरकपूरसोबतचं नातं एखाद्या काचेप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. आम्ही एकमेकांना पाहू शकतो पण हात लावू किंवा अनुभवू शकत नाही असं ते म्हणाले होते. दुसरीकडे रणबीर कपूरने नेहमीच आपले वडिलांपेक्षा आईशी जास्त चांगले संबंध असल्याचं मान्य केलं होतं. ऋषी कपूर यांचं 2020 मध्ये कॅन्सरमुळे निधन झालं.
“माझे वडील माझे चित्रपट बघायला खूप घाबरायचे. मी इम्तियाज अलीसोबत 'तमाशा' नावाचा चित्रपट केला. त्यांनी तो चित्रपट पाहिला नाही कारण त्यांना तो फार ढोंगी वाटला. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे मत नोंदवण्याऐवजी मला हा चित्रपट बघायला लावू नकोस असं सांगितलं. त्यामुळे एखाद्या चित्रपटाबद्दल ते काय विचार करतील याबद्दल भीती नेहमीच होती,” असं रणबीर म्हणाला.
राजकुमार संतोषी यांचा 2009 मधील हिट रोमँटिक कॉमेडी 'अजब प्रेम की गजब कहानी' हा ऋषी यांना अभिमान वाटणारा त्याचा पहिला चित्रपट होता अशी आठवण त्याने सांगितलं. पण रणबीर कपूरचं मत वेगळं होतं. अयान मुखर्जीचा 'वेक अप सिड' या चित्रपटावर त्याचा जास्त विश्वास होता.
रणबीरने असेही सांगितले की ऋषी कपूर यांना त्याचे व्यावसायिक किंवा यशस्वी चित्रपट आवडायचा. रणबीरचा दुसरा चित्रपट ज्याचा ऋषी कपूर यांना अभिमान वाटला तो होता प्रकाश झा यांचा 2010 मधील 'राजनीती'. राजकुमार हिरानींच्या 2018 च्या ब्लॉकबस्टर संजूमधील रणबीर कपूरचा अभिनय पाहिल्यानंतर ऋषी कपूर आश्चर्यचकित झाले होते याची आठवणही त्याने सांगितली. रणबीर आता नितेश तिवारींच्या 'रामायण' आणि संजय लीला भन्साळीच्या टलव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे.