मुंबई : अनेकदा एखादी भावना व्यक्त करण्यासाठी शब्दबंबाळ वर्णनाची गरज लागत नाही. अशा भावनांसाठी काही शब्द, काही गीतं, नव्हे..... तर काही आवाजही पुरेसे असतात. असाच आवाज होता 'मल्लिका-ए-गजल' बेगम अख्तर यांचा. 'उनकी आवाजमे एक अलग ही दर्द है....' असं त्यांच्या आवाजाचं वर्णन अनेकदा श्रोत्यांनी केलं आहे. मुळात या आवाजाची कैफियतही तशीच होती. 'बीबी' पासून बेगम अख्तर होईपर्यंतचा त्यांचा प्रवास हा फारसा सोपा किंवा सहज नव्हता.
बेगम अख्तर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज त्यांच्या अनेकजण त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहेत. कोठीपासून गजल या गीतप्रकाराला गायन क्षेत्रात आणि सर्वसामान्यांमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यासाठीसुद्धा त्यांना श्रेय दिलं जातं.
बालपणीच्या दिवसांपासूनच बेगम अख्तर यांच्या नशीबी आलेल्या अनेक अडचणी त्यांना कणखर बनवत होत्या. वडिलांचं सोड़ून जाणं, बहिणीला गमावणं, अतिशय कोवळ्या वयात शोषणाला बळी पडणं या साऱ्या गोष्टी सहन करणाऱ्या बेगम अख्तर यांनी त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून वाचा फोडली. एका वेगळ्याच अंदाजात त्या शब्दांना अशा काही सुरेल अंदाजात गाऊ लागल्या जे पाहून आणि ऐकून भलेभले श्रोते भारावले.
वयाच्या पंधराव्या वर्षी अख्तरी मंच सांभाळणाऱ्या बेगम अख्तर यांनी त्यांची पात्रता संधी मिळताच दाखवून दिली होती. भूकंपग्रस्तांसाठीच्या कार्यक्रमात आपली गायनशैली सादर केल्यानंतर त्या अशा काही वेगाने पुढे गेल्या की त्यांना अडवणं कठीण होतं. गजल आणि ठुमरी या प्रकारांवर त्यांनी विशेष प्रभुत्वं मिळवलं. चित्रपटांमध्येही त्यांनी कमालच केली. 'नसीब का चक्कर', 'रोटी', 'जलसाघर'मधील त्यांचं योगदान वाखाणण्याजोगं.
'द क्वींट'च्या वृत्तानुसार १९४५ मध्ये बॅरिस्टर इश्तियाक अहमद अब्बासी यांच्याशी निकाह करत, त्यांच्या जीवनातील नव्या पर्वाती सुरुवात झाली. पुढे हा आवाज संगीत बैठकांपासून ऑल इंडिया रेडिओपर्यंत पोहोचला. कलाविश्वात या नावाभोवती असणारं वलय वाढू लागलं होतं. पुढे जवळपास आठ वर्षांसाठी बेगम अख्तर या विश्वापासून दुरावल्या. ज्याचं कारण आजही अस्पष्टच आहे.
गर्भपात, आईच्या जाण्याचं दु:ख या साऱ्याने बिथरलेल्या या गायिकेला अखेरपर्यंत कोणी साथ दिली असेल तर ती म्हणजे त्यांचा आवाज आणि त्यांच्या कलेने. ३० ऑक्टोबर १९७४ रोजी प्रकृती उत्तम नसतानाही त्यांनी आपली कला त्याच समर्पकतेने सादर करत उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. त्याच दिवशी बेगम अख्तर यांच्या गळ्याने अखेरती तान घेतली. कारण, हा आवाज आणि या आवाजाच्या बळावर समोरच्या व्यक्तीच्या काळजात चर्रsss करणाऱ्या बेगम अख्तर यांनी या जगाचा निरोप घेतला होता. आज बेगम आपल्य़ात नसल्या तरीही त्यांचा हा प्रवास आणि अर्थातच कोणाशीही तुलना होऊ न शकणाऱ्या त्यांच्या कलाकृती मात्र कायमच प्रेक्षकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देतील यात शंका नाही.