चहलकडून हवीये 60 कोटींची पोटगी? धनश्रीचे वकील सत्य सांगत म्हणाले, 'या माध्यमातून धनश्रीची...'

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला आहे. दोघांनी 19 फेब्रुवारी रोजी घटस्फोट घेतला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 22, 2025, 09:52 AM IST
चहलकडून हवीये 60 कोटींची पोटगी? धनश्रीचे वकील सत्य सांगत म्हणाले, 'या माध्यमातून धनश्रीची...'
धनश्रीने पोटगी मागितल्याचा दावा (प्रातिनिधिक फोटो)

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाची कागदोपत्री पूर्तता 19 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. घटस्फोटाचं हे हायफ्रोफाइल प्रकरण वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात निकाली काढण्यात आलं. न्यायालयामध्ये दोघांनीही आपला निर्णय न्यायाधीशांना सांगण्याआधी न्यायाधीशांनीच त्यांना 45 मिनिटं समुपदेशन केलं. न्यायालयामध्ये दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी चहल आणि धनश्रीचा घटस्फोट झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. दोघांनी एकमेकांशी पटत नसून सुसंगतेचा आभाव असल्याचं कारण देत विभक्त होत असल्याचं न्यायालयाला सांगितलं आहे. या घटस्फोटाच्या तडजोडीदरम्यान युझवेंद्र चहल धनश्रीला 60 कोटी रुपयांची पोटगी देणार असल्याचं निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र या चर्चेवर आता धनश्री वर्माच्या वकिलांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. 

संघाबाहेर गेल्यावर धनश्रीने सोडली साथ...

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात नेमकी कोणती आर्थित तडजोड झाली आहे याबाबत अधिकृत माहिती दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाल्यानंतर देण्यात आली नव्हती. मात्र युजवेंद्र चहलला भारतीय संघातून वारंवार टाळण्यात आल्यानंतर खासगी आयुष्यामध्येही त्याची पत्नी धनश्रीने त्याची साथ सोडल्याचे समोर आले. धनश्रीने चहलला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यानंतरच दोघे आता घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. जी चर्चा खरी ठरली.

चहलला धनश्रीला 60 कोटी रुपये द्यावे लागणार?

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची घटस्फोटाच्या याचिकेवर वांद्रे न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर आता चहलला आता धनश्रीला पोटगी म्हणून तब्बल 60 कोटी रुपये द्यावे लागणार, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण याबाबत आता धनश्रीच्या वडिलांनी खरी माहिती सांगितली आहे. 

धनश्रीच्या वकिलांनी काय सांगितलं आहे...

धनश्रीच्या वकील अदिति मोहनी यांनी 60 कोटींच्या कथित चर्चेबद्दल माहिती दिली. घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी वाटाघाटींवरील न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याचं धनश्रीच्या वकिलांनी म्हटलं आहे. "धनश्रीच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. (60 कोटींची पोटगी) ही फक्त आणि फक्त अफवा आहे. या सर्व भ्रामक कल्पना आहेत. या माध्यमातून धनश्रीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे मला वाटत आहे. कारण याबाबत कोणतीही चर्चा सुरु नसताना ही बातमी सर्वांसमोर कशी येते? हा सर्व धनश्रीची बदनामी करण्याचा कट आहे. धनश्रीने कोणतीही रक्कम आतापर्यंत मागितलेली नाही," असं अदिती मोहनी यांनी म्हटलं आहे.