Salman Khan threatening to kill: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवीन एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात आता राजस्थानमधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बनवारीलाल लातुरलाल गुजर असं 25 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे. आरोपीने नुकतंच युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यामध्ये त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवली अन् आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली. बनवारीलाल लातुरलाल गुजर याने यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात त्याने खुली धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि त्यांच्या टोळीतील सदस्य माझ्यासोबत आहेत. मी सलमान खानला मारून टाकेल. कारण त्याने अद्याप माफी मागितलेली नाही, असं आरोपीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. हा व्हिडीओ राजस्थानच्या एका हायवेवर शुट करण्यात आला होता, असंही पोलिसांनी सांगितलंय.
धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची टीम तात्काळ राजस्थानला दाखल झाली अन् पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केली. या प्रकरणात मुंबईच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. आरोपीवर ५०६(२) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) यासह भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. कायद्यातील तरतुदी लक्षात घेता, पुढील तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती देखील पोलिसांनी दिलीये.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला होता. त्यावेळी दोन गोळ्या घराच्या भिंतींना लागल्या होत्या. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानची सेक्युरिटी वाढवली होती. तर काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अशातच आता मुंबई पोलिसांनी नव्या अँगलने चौकशी सुरू केली आहे.