Samay Raina Show Deepika Padukone Joke: स्टॅण्डअप कॉमेडियन समय रौनाच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' या कार्यक्रमाच्या दहावा भाग सध्या युट्यूबवर ट्रेण्ड होत आहे. भारतात हा व्हिडीओ युट्यूबवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसतोय. अनेकांना या व्हिडीओमधील स्पर्धकांचे विनोद आवडले असून हा व्हिडीओ त्यामुळेच व्हायरल होतोय. मात्र काहींनी या व्हिडीओवरुन टीका केली असून त्यामुळेच हा व्हायरल व्हिडीओ वादात सापडला आहे. आता वाद का निर्माण झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण आहे या शोमध्ये केलेला एक विनोद!
दहाव्या भागामध्ये समयबरोबर अभिनेता आणि निर्माता रघू राम, कॉमेडियन तन्मय भट, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सिद वॉरियर, 'हॅबिटॅट'चे (जिथे कार्यक्रम आयोजित केला जातो ती जागा) मालक बलराज सिंह घाई हे प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले होते. हे सर्वजण अभिनेत्री दीपिका पादुकोणसंदर्भात मानसिक तणावावरुन म्हणून डिप्रेशनवरुन करण्यात आलेल्या विनोदावर जोरजोरात हसताना दिसले. मात्र एक न्यूरोलॉजिस्टही या विनोदावर हसत असल्याचं पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. समय रैनाने यावर उत्तर दिलं असलं तरी नेमकं आधी घडलं काय ते जाणून घेऊयात.
बंटी बॅनर्जी नावाची एक महिला या 'अननेसेसरी रिअॅलिटी शो'मध्ये सहभागी झाली होती. बंटीने आपली ओळख बिहारमध्ये वाढलेली बंगाली महिला अशी करुन दिली. या दोन्ही राज्यांमधील लोक कसे आहेत यावरुन तिने सुरुवातीला काही विनोद केले. त्यानंतर तिने आपण दोन वर्षांच्या मुलाची आई असून त्यामुळे आपल्याला रात्री झोप कशी लागत नाही यावरुन काही मजेशीर विधानं केली. सतत मुलाची काळजी घेण्याच्या नादात झोप पूर्ण होत नाही असं बंटीचं म्हणणं होतं. स्वत: आई असल्यासंदर्भात बोलता बोलता बंटीने नुकतीच आई झालेली अभिनेत्री दीपिका पादुकोणचा उल्लेख केला. दीपिका मध्यंतरी मानसिक तणावाने ग्रस्त होती. ती त्यासंदर्भात जनजागृतीही करत होती. हाच संदर्भ बंटीने जोडला.
"दीपिका पादुकोण, नुकतीच आई झाली आहे, बरोबर ना? उत्तम आता तिला समजेल की खरं डिप्रेशन कसं असतं," असं बंटी बॅनर्जीने म्हटलं. ही ओळ ऐकताच सगळेच हसू लागले. यामध्ये न्युरोलॉजिस्टचाही समावेश होता. मात्र हा विनोद असंवेदनशील होता असं तिला कोणीही सांगितलं नाही. त्यानंतर बंटीने आपण ब्रेकअपमुळे आलेल्या तणावाची खिल्ली उडवत नाहीये, अशी खोचक प्रतिक्रियाही नोंदवली. "खरं डिप्रेशन तेव्हा सुरु होतं जेव्हा मध्यरात्रीनंतर तुमची झोपमोड होते आणि रात्री 3 वाजता तुमच्या बाळाला शी ला लागते, खेळावसं वाटतं किंवा भूक लागलेली असते यापैकी काहीही कोणत्याही क्रमाने घडू शकतं," असं बंटी म्हणाली.
a contestant on India's got latent trolled #DeepikaPadukone for her fake sob story which she created to defame her ex. pic.twitter.com/E2v0FxM8b2
— (@V_for___) November 17, 2024
हा व्हिडीओ पाहून एका महिलेने, "या व्हिडीओतील प्रत्येकाला स्वत:ची लाज वाटली पाहिजे. डिप्रेशनचे असे कोणते प्रकार नाहीत. जेव्हा लोक अशा बावळट कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात तेव्हा बावळटपणा वाढत चालल्यासारखं वाटतं. सर्वांना हे विनोदी वाटत आहे याचं आश्चर्य आहे," असं म्हणत या विनोदावर आक्षेप नोंदवला आहे. "लोक डिप्रेशनने मरतात आणि त्यावर हे विनोद करत आहेत, हे फारच वाईट आहे. तुम्हाला एखादा खोटं बोलत असेल असं वाटत असल्याने तुम्ही त्याची खिल्ली उडवत असाल तर त्यावरुन तुम्ही किती असंवेदनशील आणि अशिक्षित आहात हे दिसून येतं. तुम्हाला इंग्रजी येत असेल पण इतरांच्या मानसिक त्रासाबद्दल संवेदनशीलता नसेल तर तुम्ही अशिक्षितच आहात. देवाच्या कृपेने असं होऊ नये पण ती किंवा या व्हिडीओतील कोणाला तरी मानसिक त्रास व्हावा आणि कोणीतरी त्यावर असं हसावं म्हणजे हे किती गंभीर आहे याचा अंदाज इथे उपस्थित असलेल्यांना येईल," असं अन्य एकाने म्हटलं आहे.
टीका करणाऱ्यांची खिल्ली उडवताना समय रैनाने, "हे योग्य नाही, तुम्ही इथे ट्वीटरवर राग व्यक्त करु शकत नाही. तुम्ही माझ्या युट्यूब व्हिडीओवर जाऊन कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा तिथे किमान जाहिरातीमधून पैसा तरी मिळेल," असं म्हटलं आहे.