बॉलिवूड बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवरील कथित ड्रग्जप्रकरणी (Aryan Khan Drrugs Case) कारवाई केल्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) चर्चेत आले होते. समीर वानखडे तेव्हा मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत झोनल डायरेक्टर पदावर होते. आता मात्र त्यांची बदली करण्यात आली असून चेन्नईत अतिरिक्त आयुक्त आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांनी 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटींवर केलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. दरम्यान काही प्रकरणं अद्याप कोर्टात असल्याने त्यांना उत्तरं देण्यास नकार दिला. फक्त एका केसमुळे आपली ओळख नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांनी मुलाखतीत 17 लाख 40 हजारांचं रोलेक्स घड्याळ घालण्यावर स्पष्टीकरण दिलं. तसंच शाहरुख खानने विनंती केली तेव्हा नेमक्या काय भावना होत्या याबद्दलही सांगितलं. तसंच रिया चक्रवर्तीसह अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यावरही भाष्य केलं.
समीर वानखेडे यांनी या मुलाखतीत फक्त एका केसमुळे माझी ओळख नाही असं सांगितलं. 'मी मीडियाला वारंवार विचारणा करत आहे. समीर वानखेडे फक्त तेवढाच नाही, तर इतर गोष्टीही आहेत. मी ते सर्व केलं आहे, जे एक अधिकारी करतो,' असं समीर वानखेडे म्हणाले आहेत.
वयाच्या 17 व्या वर्षी बारचं लायसन्स मिळण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "हे प्रकरण न्यायालयासमोर आहे. मीडियाला कदाचित माहिती नाही, पण माझी आई एका व्यावसायिक कुटुंबातून आहे. एका व्यावसायिक कुटुंबातून असल्यास तुम्ही युनिफॉर्म घालू शकत नाही. किंवा तुमच्या नावे संपत्ती होऊ शकत नाही हे कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही. मी नागरी सेवेत आलो ही कदाचित माझी चूक असेल," असं त्यांनी म्हटलं.
"नागरी सेवेत रुजू होण्यापूर्वी तुम्ही कोणतीही वडिलोपार्जित संपत्ती जाहीर केली असेल, तर ती खंडणीच्या पैशातून मिळवली गेली आहे, असं मला वाटत नाही. जेव्हा लोक मला हा प्रश्न विचारतात तेव्हा माझा प्रश्न असतो की तुम्ही असे म्हणत असाल तर याचा अर्थ मी जन्मल्यापासून पैसे उकळत आलो आहे, तेव्हापासून लाच घेत आहे," असं समीर वानखेडे म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, "जर तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लंच, डिनर किंवा कुटुंबासह एखाद्या रेस्तराँमध्ये गेलात तर त्याला बार म्हणणार का? हा बार शब्द बदनामी करण्यासाठी वापरला आहे. हा कौटुंबिक व्यवसाय असून, माझ्या आईच्या नावे होता. तिच्या निधनानंतर तो माझ्याकडे आला आहे".
समीर वानखेडे यांच्याकडे 17 लाख 40 हजारांचा रोलेक्स घड्याळ आहे. एसआयटीला त्यांनी हे घड्याळ पत्नी क्रांती रेडकरने दिल्याचं सांगितलं होतं. या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, "माझी पत्नी दिग्दर्शक, निर्माता आणि लेखिका आहे. गेल्या 25 वर्षांपासून ती हे काम करत आहे. आम्हाला दोन मुलं आहेत हेदेखील लोकांना माहिती नसेल. तिने सध्या ब्रेक घेतला आहे. एखाद्या व्यक्तीची लाईफस्टाइल चांगली असेल तर ते चुकीच्या पद्धतीनेच मिळवलं असेल हा अर्थ नाही. माझी आई शाही कुटुंबातील आहे. सगळा पैसा चुकीच्या मार्गानेच मिळवलेला नसतो".
आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानने समीर वानखेडे यांच्याशी संवाद साधला होता. मे 2023 रोजी समीर वानखेडे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. यामध्ये त्यांनी शाहरुख खानने धीम्या गतीने तपास पुढे नेण्याची विनंती केल्याचं सांगितलं होतं. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले "मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण जेव्हा ड्रग्ज प्रकरणी कारवाई करतो तेव्हा त्याचे नातलग, आई-वडिलांबद्दल वाईट वाटतं. खासकरुन जेव्हा त्या व्यक्तीला ड्रग्जचं व्यसन असतं".
पुढे त्यांनी सांगितलं की, एकदा आम्ही ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिलेला पकडलं होतं. तिला लहान मुलं होती. अशा प्रकरणात वाईट वाटतं. पण अटक करणं आमच्या कामाचा भाग आहे. अनेकदा मीडिया हे हायप्रोफाइल प्रकरण असल्याचं सांगतं. पण आमच्यासाठी सर्व सारखे आहेत असंही ते म्हणाले.