Corona In China : कोरोनाचा हाहाकार, एका दिवसात 5 हजार लोकांचा मृत्यू!

एका रिपोर्टमुळे चीनच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. या रिपोर्टनुसार चीनमध्ये दररोज तब्बल 10 लाख लोकांना कोरोनाची लागण होतीय.

Updated: Dec 23, 2022, 10:29 PM IST
Corona In China : कोरोनाचा हाहाकार, एका दिवसात 5 हजार लोकांचा मृत्यू! title=

Corona In China : चीनमध्ये कोरोनाने अक्षरश: थैमान घातलंय. 2019 पेक्षाही कोरोनाची ही लाट अत्यंत घातक असल्याचं सांगण्यात येतंय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर नियंत्रण मिळवण्यात चीन पूर्णपणे अपयशी ठरलाय. अशातच एका रिपोर्टमुळे चीनच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. या रिपोर्टनुसार चीनमध्ये दररोज तब्बल 10 लाख लोकांना कोरोनाची लागण होतीय.

महत्त्वाची बाब म्हणजे, अवघ्या 24 तासात तब्बल 5 हजार लोकांचा मृत्यू झालाय. लंडनमधल्या ऍनाटिक्सी फर्म एअरफिनिटी लिमिटेडच्या हवाल्याने ब्लूमबर्गनं हा रिपोर्ट दिलाय. चीननं झीरो कोव्हिड धोरण मागे घेताच रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. 

कोरोनामुळे चीनमध्ये मृत्यूचं 'तांडव' 

या रिपोर्टनुसार चीनमध्ये जानेवारीत दररोज 37 लाख नव्या रूग्णांची नोंद होऊ शकतो तर मार्चमध्ये दैनंदिन रूग्णसंख्येचा आकडा 42 लाखांवर जाऊ शकतो. कोरोना वेळीच आटोक्यात आला नाही तर तब्बल 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. एप्रिल 2023 पर्यंत 1 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त केली जातेय.

चीनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसतेय. चीनच्या प्रशासनानं दिलेले आकडे मात्र वेगळेच आहेत 

चीनमध्ये कुठे कुठे वाढतोय कोरोना? 

नॅशनल हेल्थ कमिशनच्या माहितीनुसार, चीनच्या गुआंगडोंग भागात सर्वाधिक म्हणजे 1300 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. दुस-या क्रमांकावर बीजिंग शहर असून तिथं 470 तर शांघायमध्ये 47 केसेस आढळून आल्या आहेत. या शहरांप्रमाणेच चोंगक्विंग, फुजियान, युनान, हुनान, सिचुआन, तियांजिन, शांक्सी, हेनान, जियांग्सी, हुबेई, झेजियांग अशा सर्वच भागात कोरोनानं डोकं वर काढलंय. 

चीनमधील कोरोनास्थिती हाताबाहेर गेलीय. रूग्णालयांमधील बहुतांश स्टाफ कोरोनाबाधित झालाय. वारंवार लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पुरती ढासळली आहे. आता कोरोनातून लोकांना वाचवायचं की अर्थव्यवस्था सावरायची अशा दुहेरी संकटात चीन सरकार सापडलंय. मात्र चीननं नव्या व्हेरियंटवर वेळीच नियंत्रण मिळवायला हवं, नाहीतर जगाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल.