नवी दिल्ली : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर आता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.
मेघालय विधानसभेतील काँग्रेसचे आमदार अलेक्झांडर हेक यांच्यासह चार आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा मंगळवारी देणार आहेत. तसेच राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सनबोर शुल्लै आणि इतर दोन अपक्ष आमदार जस्टिन डखार आणि रॉबिनस सिंगकोन यांचा समावेश आहे.
अलेक्झांडर हेक यांनी सांगितले की, आम्ही मेघालय विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत आणि यानंतर एका जाहीर सभेत भाजपमध्ये सहभागी होणार आहोत.
येत्या काही दिवसांत मेघालय विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
मेघालय भाजपचे अध्यक्ष शिबुन लिंगदोह यांनी सांगितले की, राजीनामा देणाऱ्या या सर्व चारही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी काळात आणखीन आमदार भाजपमध्ये सहभागी होतील.
अलेक्झांडर हेक हे भाजपमधून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. मुकुल संगमा सरकारच्या मंत्रिमंडळात हेक हे आरोग्य मंत्री होते. हेक यांनी १९९८, २००३ आणि २००८ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत २००९मध्ये काँग्रेस पक्षात सहभागी झाले. २०१३ साली विधानसभा निवडणुकीत हेक यांनी पिंथोरमखाह विधानसभा क्षेत्रातुन विजय मिळवला होता.
विधानसभेची मुदत सहा मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे यापूर्वीच मेघालय विधानसभेची निवडणूक होणार आहे. मेघालयसह नागालँड आणि त्रिपुरामध्येही निवडणुका होतील.