पीएम केअर्स फंडात ५० लाख रुपये देण्याची घोषणा करून प्रसिद्धीचा फंडा

जाहिराती देऊन प्रसिद्धीची हौस भागवण्याचा या व्यक्तिचा फंडा त्याच्या अंगलट येण्याची शक्यता

Updated: Apr 10, 2020, 08:04 PM IST
पीएम केअर्स फंडात ५० लाख रुपये देण्याची घोषणा करून प्रसिद्धीचा फंडा title=

ब्युरो रिपोर्ट : पीएम केअर्स फंडात ५० लाख रुपये मदत देण्याची घोषणा करणाऱ्या व्यक्तिकडून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या बँक खात्याचा तपशील मागवला असून वर्तमानपत्रात जाहिराती देऊन प्रसिद्धीची हौस भागवण्याचा या व्यक्तिचा फंडा त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम केअर्स फंडाची स्थापना करून त्यासाठी मदत करण्याचं आवाहन जनतेला केलं. सामान्य माणसांपासून ते बड्या उद्योगपतींपर्यंत अनेकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. पण या निमित्तानं मदतीच्या नावावर घोटाळे करणाऱ्यांचीही कमी नाही. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

पीएम केअर्स फंडात एका व्यक्तिने तब्बल ५० लाख रुपयांची मदत करत असल्याचं जाहीर करून स्वतःची प्रसिद्धीची हौस भागवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न आता त्याच्या अंगलट येईल अशी चिन्हं आहेत.

फर्रुखाबाद शहरात राहणाऱ्या सुनील कुमार नावाच्या एका व्यक्तीनं पीएम केअर्स फंडात ५० लाख रुपयांची घोषणा केल्यानंतर मीडियाला बोलावून प्रसिद्धीची हौस भागवली. एवढंच नाही तर स्थानिक मीडियामध्ये त्याची जाहिरातबाजीही केली. पण संपूर्ण फार्रुखाबाद शहरात मिळूनही ५० लाख रुपयांचा निधी जमा झाला नसल्यानं या व्यक्तिनं दिलेल्या ५० लाख रुपये मदतीची चर्चा सुरु झाली.

सुनीलकुमार नावाच्या या व्यक्तीनं केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठी ५० लाख रुपये देण्याचा दिखावा केल्याची चर्चा शहरात सुरु झाली.

स्थानिक व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानं मग जिल्हाधिकारी मानवेंद्र सिंह यांची भेट घेतली आणि हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. सुनील कुमार यानं पंतप्रधान निधीसाठी दिलेला धनादेश बोगस असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी मानवेंद्र सिंह यांनी सुनील कुमार याला पत्र पाठवून तीन दिवसांत त्याच्या बँक खात्याचा तपशील देण्यास सांगितलं आहे. जर तीन दिवसांत त्याने बँक खात्याचा तपशील दिला नाही, तर त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

एकीकडे देशावर आलेल्या या संकटात सामान्य माणूसही प्रामाणिकपणाचं आणि दातृत्वाचं दर्शन घडवत असताना फार्रुखाबाद शहरातील प्रसिद्धीसाठी घडलेला हा प्रकार संताप आणणारा आहे.