नवी दिल्ली : लान्स नायक नाझिर अशोक वानी यांना भारत सरकारकडून मरणोत्तर अशोक चक्र या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या वानी यांनी शोपिया प्रांतात झालेल्या एका चकमकीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. यातच त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या याच प्रराक्रमाचा गौरव करण्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्रने त्यांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या संचलनादरम्यान, लांस नायक नाझिर अहमद वानी यांच्या आईने आणि वीरपत्नीने या पुरस्कार स्वीकारला.
Delhi: Lance Naik Nazir Ahmed Wani, who lost his life while killing 6 terrorists in an operation in Kashmir, awarded the Ashok Chakra. Award was received by his wife and mother #RepublicDay2019 pic.twitter.com/3bjYdiwTLp
— ANI (@ANI) January 26, 2019
मुळच्या कुलगाव जिल्ह्यातील अश्मुजी येथील असणाऱ्या वानी यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी राष्ट्राच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती दिली. २००४ मध्ये ते भारतीय सैन्यदलातील सेवेत रुजू झाले होते. तेव्हापासूनच दक्षिण काश्मीर येथे करण्यात आलेल्या अनेक दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
देशाच्या रक्षणासाठी म्हणून नाझिर यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. शोपिया येथे झालेल्या एका चकमकीत भारतीय सैन्याकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पण, त्यात वाणी यांना मात्र हौतात्म्य आलं होतं. त्यांच्या या बलिदानाचा सर्वांना कायमच अभिमान राहणार असून, याच माध्यमातून ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील.
वानी यांनी सुरुवातीच्या काळात एका दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता. पण, वेळीच त्यांना या चुकीच्या मार्गाची जाणीव झाली आणि त्यांना हा मार्ग सोडला. ज्यानंतर सैन्यदलात प्रवेश करत २००४ मध्ये टेरिटोरियल आर्मीच्या १६२ व्या बटालियनमधून त्यांनी आपल्या देशसेवेच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
अनेक मोहिमांमध्ये सहभागी होत त्यांनी अल्पावधीतच आपलं वेगळेपण सिद्ध केलं. याच पराक्रमी कामगिरीसाठी त्यांना दोनदा सेना मेडल देऊन गौरवण्यातही आलं होतं. राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनमध्ये असल्यामुळे ते नेहमीच दहशतवादविरोधी कारवायांमध्ये हिरीरिने सहभागी होत असत.