Uttar Pradesh: सरकारी नोकरी मिळवणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभराची सोय असल्याने, अनेकजण त्यासाठी प्रयत्न करत असतात. पण बेरोजगारांची संख्या इतकी आहे की, सरकारी नोकरीसाठी तरुणांची अक्षरश: झुंबड उडालेली असते. पण ही नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही शैक्षणिक अटींची पूर्तता करणं आवश्यक असतं. पण उत्तर प्रदेश सरकारने आता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आणखी दोन अटींचा समावेश केला आहे.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना आता दोन अटींची पूर्तता करावी लागणार आहे. तरुणांना आपली संपत्ती जाहीर करण्यासह, हुंड्यासंबंधी एक शपथपत्रही भरावं लागणार आहे. नव्याने सरकारी नोकरीत रुजू होणाऱ्या तरुणांना नियुक्तीसह आपल्या संपत्तीची घोषणा करावी लागणार आहे. यासह आपण हुंडा घेणार नाही असं शपथपत्रही त्यांना द्यावं लागणार आहे. आदेश मिळाल्यानंतर पुढील एका महिन्यात हे शपथपत्र आणि कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.
राज्य आणि उच्च दुय्यम सेवा परीक्षेत यश मिळवणाऱ्या तरुणांना नोकरीपूर्वी अनेक प्रतिज्ञापत्रे आणि प्रमाणपत्रे द्यावी लागणार आहेत. सर्व उमेदवारांना नियुक्तीच्या आधी कर्जदार आणि डिफॉल्टर नसल्याचं शपथपत्रं द्यावं लागणार आहे. तसंच एकापेक्षा अधिक पती किंवा पत्नी नसल्याचं जाहीर करावं लागणार आहे. तसंच आपण हुंडा घेणार नाही असंही शपथपत्र द्यावं लागणार आहे. याशिवाय त्यांना आपल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची घोषणा करावी लागणार आहे.
नोकरी देण्यापूर्वी त्या उमेदवाराची संपत्ती, वैवाहिक स्थिती आणि हुंड्याबाबतची त्याची विचारसरणी जाणून घेणं हा सरकारचा हेतू आहे अशी माहिती आहे.