मूल मेलं आणि 4 दिवस अंध आई-वडिलांना कळलंच नाही, त्याच्यासोबतच राहिले; डोळ्यात पाणी आणणारी घटना

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, अंध दांपत्य आपल्या मुलाला पाणी आणि अन्न देण्यासाठी हाक मारत होतं. पण त्यांना कोणतंही उत्तर मिळालं नाही.   

शिवराज यादव | Updated: Oct 30, 2024, 11:22 AM IST
मूल मेलं आणि 4 दिवस अंध आई-वडिलांना कळलंच नाही, त्याच्यासोबतच राहिले; डोळ्यात पाणी आणणारी घटना title=

मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही आई-वडिलांना 4 दिवस याची काहीच कल्पना नव्हती. मुलाच्या मृत्यूनंतही ते 4 दिवस मृतदेहासोबतच राहत होते. आपल्या 30 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं त्यांना समजलच नाही. हैदराबामध्ये ही घटना घडली. हे दांपत्य अंध असून त्यांच्या शेजाऱ्यांमुळे अखेर ही घटना उघडकीस आली. घऱातून दुर्गंध येत असल्याने त्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता हे उघड झालं. या घटनेनंतर परिसरात हळबळ व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलुवा रमणा हे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून पत्नी शांतीकुमारी आणि त्यांचा लहान मुलगा प्रमोदसह भाड्याच्या घऱात राहत होते. 30 वर्षीय प्रमोदला त्याची पत्नी सोडून गेली होती. जाताना तिने आपल्या दोन्ही मुलींनाही सोबत नेलं होतं. यानंतर प्रमोद मद्याच्या आहारी गेला होता असं वृत्त IANS ने दिलं आहे. 

नागोले पोलिस स्टेशनचे स्टेशन हेड ऑफिसर सूर्य नायक यांनी सांगितलं की, रमण आणि शांतीकुमारी या दोघांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते प्रमोदला अन्न आणि पाणी देण्यासाठी हाक मारत होते. पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्यांचा आवाज मोठा नसल्याने यामुळेच कदाचित तो शेतकऱ्यांना ऐकू गेला नाही. 

पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा रमण आणि शांतीकुमारी पूर्णपणे शुद्धीत नव्हते. त्यांची सुटका करुन त्यांना अन्न आणि पाणी देण्यात आलं. 

प्रमोदचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झोपेतच झाला असावा असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रमण आणि शांतीकुमारी यांची सुटका केल्यानंतर त्यांच्या मोठा मुलाला कळवण्यात आलं. त्यांचा मोठा मुलगा प्रदीप शहारातील एका दुसऱ्या भागात वास्तव्यास आहे. दोघांनाही त्याच्या ताब्यात सोपवण्यात आलं आहे.