केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणात बारामतीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे स्वाभाविकच विधानसभा निवडणुकीतही नेहमी प्रमाणेच यंदाही बारामती प्रकाशझोतात आहे. इथली लढत प्रतिष्ठेची झाली आहे. साहजिकच इथल्या प्रत्येक घडामोडीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील शरयू मोटर्स अचानक चर्चेत आलं. त्याला नेमकं काय कारण झालं, त्यासाठी पाहुयात हा वृत्तांत...
बारामतीतील हे शरयू मोटर्सचं शोरुम युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं हे शोरुम आहे.. या शोरुमची निवडणूक आयोगाच्या पथकानं झाडाझडती घेतली. प्रचारात असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणी सुरु होती. त्यानंतर आता थेट उमेदवाराशी संबंधित ऑफिस आणि संस्थांचीही तपासणी होऊ लागलीये. शरयू मोटर्सच झाडाझडती घेतली तरी गुलाल आमचाच असा दावा श्रीनिवास पवारांनी केलाय.
सुप्रिया सुळेंनीही झालेल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाचं पथक गेल्याची माहिती मिळाल्यानंतर अर्धवट जेवणावरुन उठल्याचं सुप्रियांनी सांगितलंय. शरयू मोटर्सची तपासणी ही नियमीत तपासणी असल्याचा दावा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय.
बारामतीत काका पुतण्यांची राजकीय लढाई सुरु आहे. या निवडणूक रणधुमाळीत सगळे राजकीय डावपेच वापरले जाऊ लागलेत... त्यामुळं बारामतीची लढाई कुणासाठीच सोपी राहिली नसल्याची चर्चा बारामतीत सुरु झालीय.