Delhi Election Results Arvind Kejriwal And Valentine Week: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि व्हॅलेंटाइन्स वीक असा योगायोग यंदा म्हणजेच 2025 मध्ये पुन्हा एकदा जुळून आला आहे. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मागील दशकभरापासून व्हॅलेंटाइन्स वीक कायमच लकी ठरला आहे. यंदा सुद्धा निवडणुकीचे निकाल हे 8 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाइन्स वीकच्या दुसऱ्या दिवशी लागत आहेत. संपूर्ण जग एकीकडे व्हॅलेंटाइन्स डे विकच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना प्रपोज करणारा दिवस म्हणून साजरा करत असतानाच दुसरीकडे दिल्लीची सत्ता आणि केजरीवाल हे समिकरण सलग चौथ्यांदा कायम राहणार का हे आज स्पष्ट होणार आहे. (दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे क्षणोक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या येथे क्लिक करुन.)
राजकीय इतिहास पाहिला तर दिल्लीची निवडणूक आणि व्हॅलेंटाइन्स वीक असा योगायोग जेव्हा जेव्हा जुळून आला तेव्हा केजरीवाल यांचं आणि त्यांच्या पक्षाचं भलं झालं आहे. 2013 मध्ये केजरीवाल डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र 49 दिवसांमध्येच म्हणजेच 14 फेब्रुवारी 2014 ला केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन्स वीकचा शेवटचा दिवस मानला जातो.
केजरीवाल यांच्या पक्षाने 2014 ची लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली. मात्र केंद्रीय स्तरावरील निवडणुकीत त्यांच्या पदरी निराशाच पडली. पंजाब वगळता 'आप'ला कुठेच यश मिळालं नाही. मात्र त्यानंतर 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 'आप'ने 70 पैकी 67 जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा जनमताचा कौल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी 14 फेब्रुवारीचाच म्हणजेच व्हॅलेंटाइन्स वीकचा शेवटचा दिवसच निवडला. शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांनी जनतेकडे तुमचं माझ्यावरील प्रेम असेच ठेवा असं आवाहन व्हॅलेंटाइन्सचा उल्लेख करत केलेलं.
2020 मध्येही 'आप'ने व्हॅलेंटाइन्स वीकमध्येच विधानसभा निवडणूक जिंकली होती. या वेळी केजरीवाल यांनी 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली. विशेष म्हणजे 2022 मध्ये पंजाब आणि गोव्यामधील विधानसभा निवडणुकीचं मतदान 14 फेब्रुवारी रोजी झालं होतं. पंजाबमध्ये 'आप'चं सरकार आलं आणि गोव्यातही पक्षाला चांगली कामगिरी करता आली.
2025 ची दिल्ली विधानसभा निवडणूक ही केजरीवाल यांच्यासाठी सर्वात आव्हानात्मक निवडणूक मानली जात आहे. आतापर्यंतच्या 14 एक्झिट पोलपैकी 12 एक्झिट पोलने केलेल्या दाव्यांनुसार केजरीवाल यांच्या 'आम आदमी पार्टी'ला यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांचा पक्ष यंदाच्या निवडणुकीत पराभूत होईल अशी शक्यता 12 एक्झिट पोल्समध्ये व्यक्त करण्यात आली आहे. 2013 मध्ये केजरीवाल यांना दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. 2015 आणि 2020 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल यांच्या पक्षानेच विजय मिळवला होता. 2012 मध्ये स्थापन झालेल्या 'आप'ने दिल्लीतील कामगिरीच्या जोरावरच अवघ्या दहा वर्षांमध्ये म्हणजेच 2022 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला. त्यामुळेच हे केजरीवाल आणि व्हॅलेंटाइन्स वीकचं कनेक्शन यंदाही कायम राहणार की केजरीवालांच्या पक्षाला पराभवाचं तोंड पहावं लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.