उत्तर प्रदेशच्या आग्र्यात एक तरुण टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने स्पोर्ट्स बाईक घेऊन फरार झाला. धक्कादायक बाब म्हणजे, तरुण आपल्यासोबत एका चहावाल्याला घेऊन आला होता. त्याने शोरुममध्ये चहावाला आपला बाप असल्याचा बनाव केला. नालबंद नाक्यावरील कमल मोटर्स नावाचं बाईकचं शोरुम आहे.
3 नोव्हेंबरला शोरुम मालकाने लोहामंडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीत सांगण्यात आलं आहे की, साहिल नावाचा एक तरुण शोरुममध्ये सेकंड हँड रेसिंग बाईक खरेदी करण्यासाठी आला होता. एक लाख रुपयांमध्ये बाईकचा सौदा झाला होता. साहिलने आपण वडिलांना सोबत आणत आहेत असं सांगत तिथून निघून गेला होता.
काही वेळाने आरोपी साहिल एका वयस्कर नागरिकाला शोरुमवर घेऊन आला. आरोपीने हे माझे वडील आहेत असं सांगितलं. साहिलने वयस्कर नागरिकाला शोरुममध्ये बसवलं आणि शोरुम मालकाला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे असं सांगितलं. यानंतर शोरुम मालकाने त्याला टेस्ट ड्राईव्हसाठी बाईक दिली. आरोपीचा कथित पिता शोरुम मालकासोबत बसला होता.
बराच वेळ झाला तरी साहिल परत आला नाही, तेव्हा शोरुम मालकाने वयस्कर नागरिकाला तो कुठे आहे याची माहिती घेण्यास सांगितलं. यावेळी त्या वयस्कर व्यक्तीने आपण त्याचे वडील नसल्याचं सांगितलं. आपली एक चहाची टपरी आहे आणि साहिल तिथे कधीतरी चहा पिण्यासाठी येतो असं त्याने सांगितलं. साहिलने एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे असं सांगितल्याने आपण त्याच्यासोबत आलो होतो असा दावा त्याने केला.
शोरुम मालकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे 5 नोव्हेंबरला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कलम 303 (2) आणि 318 (4) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. 6 नोव्हेंबरला पोलिसांनी आरोपीला जीयआसी मैदानाजवळून अटक केली
पोलिसांनी साहिलकडून चोरी करण्यात आलेली बाईक जप्त केली आहे. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याला बाईक चालवण्याची आवड आहे, पण आर्थिक स्थिती चांगली नसल्याने खरेदी करु शकत नाही. अशात आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने बाईक चोरी करण्याची योजना आखली होती. पोलिसांनी बाईक जप्त केली असून, कारवाई सुरु केली आहे.