कानपूरच्या आबिद अली हत्याकांडमध्ये आणखी एक खुलासा झाला आहे. आबिदची पत्नी शबानाने आपल्या 20 वर्षं लहान प्रियकर रेहानसाठी पतीच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबला. यावेळी रेहान आणि त्याचा मित्र विकास यांनी आबिदचे हात-पाय पकडून ठेवले होते. मृत्यू ओव्हरडोसमुळे झाल्याचं दाखवण्यासाठी शबानाने पतीच्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूल ठेवल्या होत्या. पण शवविच्छेदन अहवालात त्यांची पोलखोल झाली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
गेल्या गुरुवारी कानपूर पोलिसांनी बिठूरमधील रहिवासी आबिद अलीच्या हत्याप्रकरणी त्याची पत्नी शबाना, तिचा प्रियकर रेहान यांना अटक केली होती. यानंत त्यांनी हत्येत सहभागी तिसरा आरोपी विकासलाही आज बेड्या ठोकल्या. विकास हा रेहानचा मित्र आहे. पैशांच्या हव्यासापोटी त्याने रेहान आणि शबाना यांना मदत केली होती.
19 जानेवारीला पोलिसांनी बिठूर येथे राहणाऱ्या आबिद अलीचा मृतदेह त्याच्या घऱात सापडला होता. त्यावेळी शबाना रडत होती आणि शक्तीवर्धक गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाल्याचा दावा करत होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आबिदच्या खिशात शक्तीवर्धक कॅप्सूलची 8 पाकिटं सापडली.
पोलिसांनाही सुरुवातीला गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाला असावा असं वाटलं. पण दोन दिवसांनी जेव्हा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा मात्र पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण आबिदची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी जेव्हा याप्रकरणी तपास सुरु केला तेव्हा शबानाने मोबाईलवरुन रात्री अनेकदा उन्नावच्या बांगरमऊ येथे राहणाऱ्या रेहानशी संवाद साधल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतलं. नंतर शबाना आणि रेहान यांची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी हत्येची कबुली दिली.
चौकशीत समोर आलं की, शबानाने सोशल मीडियावर आपला तरुणपणातील फोटो लावला आहे. यामुळेच रेहानने शबानाशी बोलणं सुरु केलं होतं. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. एक दिवस रेहान शबानाला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी आबिद घरी नव्हता. यानंतर दोघे सतत एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यात संबंध निर्माण झाले.
यादरम्यान शबानाने आता आपल्याला रेहानसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पतीने विरोध केला असता त्याला रस्त्यातून हटवण्याचं तिने ठरवलं. यासाठी तिने रेहानला 20 हजार रुपये दिले. रेहानने हत्येत मदत मिळावी यासाठी दिल्लीत राहणारा आपला मित्र विकासलाही बोलावलं.
शबानाचा पती कधीकधी शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल घेत असे. अशा परिस्थितीत, शबानाने या कॅप्सूलद्वारे मृत्यू दाखवण्याची योजना आखली. 19 जानेवारी रोजी तिने पतीकडून आठ शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल मागवल्या. मग रात्री तिने तिच्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला बोलावून पतीची हत्या केली. हत्येनंतर त्याच्या खिशात कॅप्सूलचे पॅकेट ठेवण्यात आले होते. सकाळी उठल्यावर तिने गोंधळ घातला की तिच्या पतीने खूप जास्त शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल घेतल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
20 जानेवारी रोजी पोलिसांनी आबिदच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. दोन दिवसांनी, बुधवारी संध्याकाळी, जेव्हा आबिदचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिस ठाण्यात पोहोचला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. यानंतर, जेव्हा पोलिसांनी शबानाचा भाऊ सलीमची चौकशी केली तेव्हा त्याने बहिणीनेच हत्या केल्याचं सांगितलं.
यानंतर पोलिसांनी तपास करून शबानाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी गुरुवारी शबाना आणि तिचा प्रियकर रेहानला अटक केली. आज, शुक्रवारी, तिसरा आरोपी विकास यालाही अटक करण्यात आली. विकासने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, रेहानने त्याला हत्येत मदत करण्यासाठी 10 हजार रुपये दिले होते.