मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता संमेलनाच्या तोंडावरच नवा वाद समोर आला आहे. नयनतारा सेहेगल या संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होत्या, पण, आता मात्र या संमेलनाला त्यांची उपस्थिती नसणार असल्याचं कळत आहे. खुद्द आयोजकांनीच त्यांना संमेलनाला न येण्याचं आवाहन केलं आहे.
काही पक्षांनी नयनतारा सेहेगल यांच्या संमेलनातील उपस्थितीवर आक्षेप घेतला होता. मराठी भाषिक नसल्यामुळेच त्यांच्यावर हा आक्षेप घेण्यात आला होता. पण, त्यानंतर नयनतारा सेहेगल यांनीही संमेलनाला न येण्याचा निर्णय घेतल्याचं कळत होतं. पण, तसं नसून खुद्द आयोजकांनी सेहेगल यांना संमेलनाला न येण्याचं आवाहन केलं आणि साहित्य विश्वाने अखेर या विरोधापुढे शरणागती पत्करल्याचं स्पष्ट झालं. मुख्य म्हणजे साहित्य विश्वातील ही नामुष्की सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून, आता प्रमुख अतिथी म्हणून साहित्य संमेलनाला कोणाची उपस्थिती असणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सहगल या इंग्रजीतून लिखाण करणाऱ्या लेखिका असल्यामुळे त्यांना विरोध होत होता. संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात सहगल देशातील सद्यस्थितीर, असहिष्णू वृत्तीवर वक्तव्य करतील याचा अंदाज आल्यामुळेच त्यांचं निमंत्रण रद्द केलं गेल्याचं म्हटलं जात आहे.