नवी दिल्ली: दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे धागेदोरे समोर आले आहेत. उमर खालिदवर गोळीबार करणाऱ्या मारेकऱ्यांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, त्यापूर्वीच दोन तरुणांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत दोन तरुण आपणच उमर खालिदवर हल्ला केल्याचे सांगत आहेत. उमरला ठार मारुन आम्हाला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट द्यायची होती, असे या तरुणांनी म्हटले आहे.
तसेच आम्ही १७ ऑगस्टला आम्ही क्रांतिकारी करतार सिंग सरभा यांच्या निवासस्थानी आत्मसमर्पण करु, असे या तरुणांनी सांगितले आहे. या तरुणांनी व्हीडिओत आपली ओळखही सांगितली आहे. सर्वेश शहापूर आणि नवीन दलाल अशी त्यांची नावे असून या हल्ल्यासाठी इतरांना जबाबदार धरले जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या दोघांच्या दाव्यात तथ्य आढळले तर त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हा व्हीडिओ हरियाणा किंवा पंजाबमध्ये चित्रित करण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या दिल्ली पोलिसांकडून या दोघांना शोधण्यासाठी हरियाण व पंजाब पोलिसांची मदत घेतली जात आहे.
उमर खालिद याच्यावर सोमवारी कॉन्स्ट्युट्युशन क्लब ऑफ इंडियाच्या परिसरात गोळीबाराचा प्रयत्न झाल होता. ऐनवेळी मारेकऱ्यांचे गावठी पिस्तूल जाम झाल्याने ते गोळी चालवू शकले नाहीत. त्यामुळे उमर खालिदचा जीव थोडक्यात वाचला होता. मात्र, त्यानंतर पळून जाताना मारेकऱ्यांनी हवेत गोळीबार केला होता.