उत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत असून, तापमानातही चढ- उतार होताना दिसत आहेत.   

सायली पाटील | Updated: Jan 31, 2025, 07:59 AM IST
उत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार? title=
Maharashtra Weather news winter vibes subsides himachal kashmir will experiance massive cold wave

Maharashtra Weather News : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमानात बदल होत असून, काही भागांमध्ये आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये आता चिल्लई कलांचा काळ पूर्ण झाला असून, हिमाचल प्रदेशातही अनेक भागांमध्ये पावसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

इथं महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचा झाल्यास राज्यात एकाएकी सूर्य डोक्यावर आल्यानंतर त्याचा दाह दिवसागणिक वाढत असल्यामुळं राज्याच्या काही भागांवर पावसाचं सावट असल्याचा इशारा मागील 24 तासांसाठी जारी करण्यात आला होता. हा इशारा येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रासाठी लागू राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टी क्षेत्र आणि गोव्यासह कर्नाटकपर्यंतचा किनारपट्टी भाग याच प्रभावाखाली राहणार असून इथं उष्मा अधिक भासणार आहे. 

राज्यात बहुतांशी तापमानात वाढ होणार असून, पहाटेचा गारठा वगळता उरलेल्या संपूर्ण दिवसभरात मात्र उष्ण वातावरण जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत असून, राज्यात सध्या निफाड इथंच निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. इथं तापमानाचा आकडा 11 ते 13 अंशांदरम्यान असून, कमाल तापमानाची नोंद रत्नागिरी इथं करण्यात आली आहे.

हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबईतील 'या' गर्दिच्या ठिकाणी रहिवासी इमारतीवर कोसळला मेट्रोचा पिलर 

पश्चिमेकडून वाहणारे शीतलहरींचे झोत गुजरातमार्गे उत्तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेशच्या दिशेनं कूच करत असून, तिथं बंगालच्या उपसागरातून वाहणारे वारेही हवामानावर परिणाम करताना दिसत आहेत. राज्यावर चहूबाजूंनी होणाऱ्या या बदलांमुळं तापमानवाढीसह पाऊस आणि क्वचितप्रसंगी गारपीटीचं सावटही वाहायला मिळत आहे. 

फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाचा आकडा वाढण्यास सुरुवात होणार असून, थंडी काढता पाय घेण्यास सुरुवात करेल . ज्यामुळं उन्हाळ्याचा फेब्रुवारीच्या मध्यापासूनच सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.