श्रीनगर: काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कलम ३७० रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळा होईल, असा इशाराच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी दिला. ते सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये बाहेरील लोकांना आणून वसवण्याचा विचार काहीजण करत आहेत. जेणेकरून आमची लोकसंख्या कमी होईल, असे त्यांना वाटते. हे सर्व सुरु होताना आम्ही काय झोपून राहणार का? आम्ही याचा मुकाबला नक्की करू. ३७० कलम रद्द केले तर अल्लाह कुठे राहणार? कदाचित अल्लाहचीच इच्छा असेल की आम्ही त्यांच्यापासून स्वतंत्र व्हावे. आम्ही पण बघतोच तुम्ही काश्मीरमधील कलम ३७० कसे रद्द करता? मग तुमचा झेंडा फडकावयला कोण तयार होते, हे मी बघतोच. अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्याने तुम्ही आमचे हदय तोडाल, असे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काश्मीरमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'कलम ३७०' आणि '३५ ए' हे मुद्दे आजही भाजपच्या अजेंड्यावर असल्याचे स्पष्ट केले होते. केवळ या मुद्द्यांवर सर्वसंमती होत नसल्यामुळेच हा प्रश्न अडलेला आहे. साठी हवी असलेली वातावरणनिर्मिती आम्ही करू शकलो नाही. मात्र, देशाची सुरक्षा आणि अखंडतेशी संबंधित असलेले हे मुद्दे असून देशहितासाठी ते रद्द होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले होते.
काश्मीरला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या आणि सर्व ऋतूंमध्ये सुरू असलेल्या जम्मू-श्रीनगर महामार्गावरील नागरी वाहनांच्या वाहतुकीवर रविवारपासून आठवडय़ातले दोन दिवस बंदी घालण्यात आली. परंतु नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे काश्मिरातील प्रमुख राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध करण्यासाठी महामार्गावर निषेध मोर्चे काढले.