नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी जर valved respirators लावलेल्या एन 95 (N95 Mask) मास्कचा वापर करत असाल तर सतर्क व्हा. जर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या मास्कचा वापर करत असेल, तर यामुळे इतरांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एन 95 मास्कमध्ये लावण्यात आलेल्या valved respiratorsमुळे व्हायरस वातावरणात पसरण्याचा धोका असल्याचं समोर आलं आहे.
केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून, valved respirators लावलेल्या एन 95 मास्कबाबत इशारा दिला आहे. पत्रातून असं सांगण्यात आलं आहे की, यामुळे व्हायरसचा प्रसार होणं थांबत नाही आणि हे मास्क कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या विरुद्ध आहे. आरोग्य मंत्रालयातील आरोग्य सेवा महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी, राज्यांच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, अनेक लोक valved respirators लावलेल्या एन 95 मास्कचा अधिक वापर करत आहेत.
'छिद्रयुक्त श्वसनयंत्र अर्थात valved respirators लावलेलं एन 95 मास्क कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सांगितलेल्या उपायांच्या विरुद्ध आहे. कारणं एन-95 valved respirators व्हायरसला मास्कच्या बाहेर येण्यापासून थांबवू शकत नाही. या बाबी लक्षात घेता, सर्व लोकांनी फेस कव्हर करण्यासाठी योग्य त्या गोष्टींचं पालन करण्याचं आणि एन 95 मास्कचा अयोग्य वापर प्रतिबंधित करण्याबाबत, संबंधितांना निर्देश देण्याचंही त्यांनी सांगितलं आहे.