जयपूर: राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवान राजकीय नाट्याच्या Rajasthan Political Crisis पार्श्वभूमीवर अखेर भाजप नेत्या वसुंधरा राजे Vasundhara Raje यांनी मौन सोडले आहे. वसुंधरा राजे यांच्या इशाऱ्याशिवाय राजस्थानमधील भाजपच्या राजकारणाचे पानही हालत नाही. तरीही सचिन पायलट यांच्या बंडानंतर वसुंधरा राजे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे वसुंधरा राजे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
अखेर वसुंधरा राजे यांनी शनिवारी आपले मौन सोडले. त्यांनी म्हटले की, राज्यात सुरू झालेल्या या कहलाची किंमत राज्यातील जनतेला मोजावी लागत आहे, हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचे खापर भाजपच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही वसुंधरा राजे यांनी म्हटले.
#RajasthanFirst pic.twitter.com/Qzq1iv0Yuy
— Vasundhara Raje (@VasundharaBJP) July 18, 2020
राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडाला भाजपची फुस असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. मात्र, वसुंधरा राजे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आमच्या राज्यात करोनामुळे ५०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि जवळजवळ २९ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच टोळधाडीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांनी सीमा ओलांडल्या आहेत. राज्यातील वीजेची समस्याही वाढली आहे. पण काँग्रेस मात्र भाजप आणि भाजप नेतृत्वाला दोष देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने जनतेचे हिताला महत्व दिले पाहिजे. कधी तरी जनतेबाबत विचार करा, असे वसुधंरा राजे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरएलपीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी मात्र वसुंधरा राजे यांच्यामुळेच सचिन पायलट यांचे बंड फसल्याचा आरोप केला आहे. वसुंधरा राजे यांनी सचिन पायलट यांच्यासोबत निघालेल्या अनेक काँग्रेस आमदारांना फोन करुन परत पाठवले. त्यामुळे राजस्थानमधील अशोक गेहलोत यांचे सरकार वाचले, असे बेनीवाल यांनी म्हटले होते.