पाटणा : कोरोनामुळे (Corona) बिहार विधानसभेचे निकाल ( Bihar Election Results) हाती यायला वेळ लागणार आहे. बिहारमधल्या (Bihar Election) २४३ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होत आहे. मात्र कोरोनामुळे निकाल दुपारी ३ नंतरच अपेक्षित आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता यंदा एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान केंद्रं वाढल्यामुळे इव्हीएममध्येही वाढ झाली आहे. मतदान केंद्रे पाहता मागील निवडणुकीच्या मतमोजणीपेक्षा या वेळी मतमोजणीला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. पूर्वी, जिथे १२ तासांत मतमोजणी केली जात असे, यावेळी यास चार ते सहा तास जास्त लागू शकतात. मतमोजणी केंद्राच्या सभागृहात कोरोना संक्रमणाच्या दरम्यान खबरदारी म्हणून फक्त सात टेबल्स असतील. यापूर्वी १४ टेबल होते. मतमोजणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेतली जात आहे.
बिहारच्या ३८ जिल्ह्यांमधील ५५ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. प्रामुख्यानं नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादवांच्या नेतृत्वात पाच पक्षांच्या महागठबंधन यांच्यात लढत असली तरी स्वबळावर लढणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीकडेही लक्ष असणार आहे.
दरम्यान, एक्झिट पोल्सनी बिहारमध्ये सत्तांतराची शक्यता वर्तवली असताना मतमोजणी केंद्रांवर तणाव वाढण्याची भीती निवडणूक आयोगाला वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणी केंद्रीय पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
तेजस्वी यादव वैशाली जिल्ह्यातल्या राघोपूरमधून तर त्यांचे थोरले बंधू तेजप्रताप समस्तीपूर जिल्ह्यातल्या हसनपूरमधून निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेत असलेले नितीश कुमार स्वतः लढत नसले, तरी त्यांच्या अर्धा डझन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचबरोबर भाजपचीही कसोटी असणार आहे. भाजपला सत्तेत जाण्यासाठी जेडीयूचा आधार हवा आहे. त्यामुळे त्यांनी संयुक्तपणे ही निवडणूक लढविली आहे. यात जेडीयू जास्त जागा जिंकणार की भाजपच याचीही उत्सुकता आहे.