Corona Return : देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढतेय, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 7,830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 233 दिवसांनंतर देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 1 सप्टेंबरला 7,946 रुग्ण आढळले होते. केंद्रीय आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात देशात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असतानाच आता आणखी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. ओमिक्रॉनचा (Omicron) सब व्हेरिएंट XBB.1.16 मध्ये म्यूटेशन झालं आहे. त्यामुळे नवा सब व्हेरिएंट (Sub Variant) XBB.1.16.1 सापडला आहे.
कुठे आढळला XBB.1.16.1?
भारतातील काही कोरोना प्रकरणात जीनोम सिक्सेंसिंग (Genome Sequencing) करण्यात आलं. यात म्यूटेटेड XBB.1.16.1 या सब व्हेरिएंटचे 234 रुग्ण आढळून आलेत. INSACOG दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, गुजरात, हरियाणासहित 13 राज्यांमध्ये नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
काय आहे XBB.1.16.1?
प्रत्येक विषाणू हा म्यूटेट होत असतो. म्यूटेशनमुळे त्याचे नव-नवे व्हेरिएंट तयार होतात. भारतात आता अचानक कोरोना रुग्णांमध्ये झालेली वाढ ही ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट XBB.1.16 मुळे झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. XBB.1.16.1 हा सब व्हेरिएंट XBB.1.16 चा एक भाग आहे. INSACOG ने दिलेल्या माहितीनुसार देशातल्या 22 राज्यात 1 हजार 744 प्रकरणात XBB.1.16 सब व्हेरिएंट दिसून आला आहे.
XBB.1.16.1 कती धोकादायक?
सब व्हेरिएंट XBB.1.16.1 हा किती धोकादायक आहे याचा शोध अद्याप लागलेला नाही. गेल्या वर्षी ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट XBB आला होता. त्यात म्यूटेशन होऊन XBB.1.16 आणि आता XBB.1.16.1 सब व्हेरिएंट पसरत चालले आहेत. एकट्या भारतात आतापर्यंत ओमिक्ऱनचे तब्बल 400 हून अधिक सब-व्हेरिएंट आढळले असून त्यात सर्वाधिक XBB चा समावेश आहे.
काय आहे लक्षणं?
INSACOG दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत जितके कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी जवळपास 38.2 प्रकरणं ही XBB.1.16 या सबव्हेरिेएंटची आहेत. XBB.1.16 ची लक्षणं ओमिक्रॉनच्या इतर सब-व्हेरिएंटप्रमाणेच आहेत. यात ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी या लक्षणांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे ही लक्षणं जास्त गंभीर नाहीत. रुग्णांवर घरीच उपचार केल जाऊ शकतो. पण गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे.
कोरोनाची नवी लाट?
देशात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने कोरोनाची नवी लाट (Corona New Wave) येणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण याबाबत असा कोणताही दावा अद्याप करण्यात आलेला नाही. सध्या घाबरण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूचं प्रमाण कमी आहे आणि रुग्णालयात दाखल करण्याइतकी संख्या नाही. पण असं असलं तरी बेजबाबदारपणे वागू नका असं आवाहनही डॉक्टरांनी केलं आहे.
XBB.1.16 हा सब व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. लसीकरण झालेल्यांनाही या व्हेरिएंटची लागण होऊ शकते. त्यामुळे कोविड नियमांचं (Corona Guid Lines) पालन करणं आवश्यक आहे. बूस्टर डोस घेतला नसेल तर तो घेणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, सर्दी-खोकला झाला असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळा असं आवाहनही डॉक्टरांनी केलं आहे.