मुंबई : स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिल्यामुळे होणाऱ्या टीकेला भारत बायोटेकनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लसीच्या 200 टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत. भारत बायोटेकवरील टीका अनाठायी आहे. लस निर्मितीचा आमच्याकडे प्रचंड अनुभव आहे. 123 देशात भारत बायोटेक पोहोचलेली आहे. एवढा प्रदीर्घ अनुभव असलेली एकमेव कंपनी असल्याचं भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी उत्तर दिलंय.
इंग्लंडमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचे 8 रुग्ण राज्यात सापडलेत. नव्या कोरोनाच्या 8 रुग्णांपैकी 5 रुग्ण मुंबईतले आहेत. तर ठाण्यातील एक, पुण्यातील एक आणि मीरा भाईंदरमध्ये एक रुग्ण आहे. या रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलंय. नव्या कोरोनाची लागण झालेले सर्वजण ब्रिटनमधून प्रवास करुन आलेत.
महाराष्ट्रात नव्या कोरोनाचे आठ रुग्ण सापडल्यानं आरोग्य यंत्रणा सावध झालीय. मुख्यमंत्र्यांनीबी आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाबाबत वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत आरोग्य विभाग आणि मनपा आयुक्तांशी चर्चा केलीय. तसंच अधिक खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.