Coronavirus BF.7 Symptoms: चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. (Coronavirus) कोरोनाचा कहर पाहता भारतात देखील त्याची दहशत पुन्हा दिसू लागली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. चीनमध्ये परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. (Coronavirus Update) दरम्यान, Omicron चे सब-व्हेरियंट BF.7 (BF.7) ज्याने चीनमध्ये कहर केला असून या नवीन व्हेरियंटने भारतात देखील प्रवेश केला आहे.
देशात आतापर्यंत या प्रकाराची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहवालानुसार, गुजरात आणि ओडिशामध्ये BF.7 प्रकारांची प्रकरणे समोर आली आहेत. BF.7 हे Omicron च्या BA.5 व्हेरिएंटचे सब-व्हेरियंट आहे. तसेच या व्हेरिएंटला ओमिक्रॉन स्पॉन असेही म्हणतात. BF.7 उप-प्रकार पहिल्यांदा भारतात ऑक्टोबरमध्ये आढळला होता.
सब-व्हेरियंट BF.7 बद्दल सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, ज्यांना कोरोनाची लस मिळाली आहे अशा लोकांना देखील या व्हेरियंटची (corona Variant) लागण होऊ शकते. हे आधीच यूएस, यूके आणि बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह अनेक देशांमध्ये आढळले आहे.
वाचा: कोरोनाची ही 2 गंभीर लक्षणे दिसली तर समजून जा, धोक्याची घंटा वाजली!
BF.7 उप-प्रकारची लक्षणे सामान्य फ्लू सारखीच असतात. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, कफ, अंगदुखी इ. लक्षणे दिसून येतात. तसेच हा संसर्ग कमी वेळात जास्त प्रमाणात पसरतो. यासाठी सार्वजनिक ठिकाणी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अहवालानुसार, BF.7 प्रकार श्वसन प्रणालीच्या वरच्या भागाला संक्रमित करतो. त्यामुळे ताप, खोकला, घसादुखी, नाक वाहणं, अशक्तपणा, थकवा यांसारखी लक्षणं दिसतात. लागण झालेल्या काही व्यक्तींमध्ये उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणं देखील जाणवतात. आरोग्य तज्ञांच्या मते, नवा सबव्हेरियंट देखील पूर्वीच्या प्रकारासह नैसर्गिक संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीनं विकसित केलेली प्रतिकारशक्ती त्वरीत बायपास करते.
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल यांनी लोकांना लसीकरण करून घेण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लोकांना घाबरू नका असे आवाहन केले आणि स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आतापर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पॉल म्हणाले, 'लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. ज्या लोकांना आधीच कोणताही आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचे पालन करावे.
चीनमध्ये कोरोना कहर केला असला तरी, चीनमध्ये अद्याप सर्वांना कोरोनाची लस मिळालेली नाही. चीनमधील वृद्ध लोकसंख्येमध्ये, फार कमी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला आधीच दुसरा काही आजार असेल, तर कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याची प्रकरणं समोर आली आहे.