नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे इपीएफओ (EPFO) खातेधारकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी भविष्य निधीवर नव्या पद्धतीने व्याज दर लागू केला जाऊ शकतो. एका रिपोर्टनुसार, पीएफ रक्कमेवर मिळणाऱ्या व्याज दरात चालू आर्थिक वर्षात कपात केली जाऊ शकते.
एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे इपीएफओ संदर्भात सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था केंद्रीय न्यासी बोर्ड (सीबीटी) केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या नेत्रृत्वात नोव्हेंबरमध्ये भेटणार आहेत.
देशभरातील ईपीएफओमध्ये जवळपास ५ कोटींहून अधिक सदस्य आहेत. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या महिन्याच्या २३ तारखेला ईपीएफओची प्रस्तावित बैठक पार पडणार आहे. २०१७-१८ साठी चालू आर्थिक वर्षात व्याज दरात घट करुन ८.५ टक्के करण्याचा विचार सुरु आहे.
रिपोर्टनुसार, व्याज दरात कपात होणार असली तरी पीएफ खातेधारकांना मिळणाऱ्या रिटर्न्समध्ये कमी होणार नाहीये. तर, पीएफ खातेधारकांना तितकीच रक्कम परत मिळेल किंवा गेल्यावेळेच्या तुलनेत अधिक रिटर्न मिळेल.
काही दिवसांपूर्वी आलेल्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी पीएफच्या जमा रक्कमेवर व्याज दराचा निर्णय विश्वस्तांच्या समोर सादर केला जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सीबीटीने २०१६-१७ साठी व्याज दरात कपात करुन ८.६५ टक्के केला होता. यापूर्वी २०१५-१६ साठी व्याज दर ८.८ टक्के करण्यात आला होता.