एकता सूरी, झी मीडिया, मुंबई : शेतातील समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत शेतकरी विसंबून होते ते कृषीविभागातील अधिकाऱ्यांवर. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागायची, पैसा खर्च करावा लागायचा. शेतकऱ्यांची हीच नड पंजाबच्या दर्शन के सिंग यांनी ओळखली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वताचं युट्यूब चॅनल सुरु केलं.
सेंद्रीय शेती, कुकुट पालन, शेळी पालन यासह विविध प्रकारच्या आधुनिक शेतीची पद्धती, आधुनिक कृषी अवजारं, कृषीविषयक अडचणींचं समाधान त्यांनी आपल्या युट्युब चॅनलवरुन करण्यास सुरुवात केली.. आणि बघता बघता लाखो शेतकरी त्यांच्या चॅनचे फॉलोअर्स झाले.
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रातील संतोष जाधव यानंही आपलं युट्यूब चॅनल सुरु केलंय. या चॅनलच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, स्वताच्या शेतीतून उत्पादनंही घेतात आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो रुपयांचं अतिरिक्त उत्पन्नही मिळवतात..
आजही अनेक शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबलेत. तोट्याचा उद्योग म्हणून शेतीकडं पाहिलं जातं. मात्र देशातल्या या आधुनिक शेतकऱ्यांनी युट्यूबचा वापर करत शेतीतून तिहेरी फायदा मिळवला आहे.