नवी दिल्ली : जगभरात शेअर बाजारात घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे गुंतवण्याबाबत सावध आहेत. कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळेच गुंतवणुकदारांनी सध्या या व्यवहारांपासून दूर राहणं पसंत केलं आहे. अशा परिस्थितीत सोनं हा एकच पर्याय आहे, जिथे गुंतवणुकदार पैसे गुंतवत आहेत.
सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. सोन्याचा दर (एप्रिल वायदा) जवळपास ५०० रुपयांनी वाढून तो ४४ हजार प्रति दहा ग्रॅमवर पोहचला आहे. तर, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,०६३ रुपयांच्या वर गेला आहे. कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर लवकरच ५० हजार रुपयांवर पोहचण्याची शक्यता आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या (Crude Oil) भावात ३० टक्क्यांहून अधिकच्या घसरणीनंतर, जागतिक आर्थिक वाढीबाबत चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळेच सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात वाढीची नोंद करण्यात आली. परंतु, जागतिक शेअर बाजारात घसरण असल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं १६८० डॉलर प्रति औंसच्या जवळपास सुरु आहे. MCX गोल्ड एप्रिल वायदा ४४,७१८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचला आहे.
मोतीलाल ओसवालचे उपाध्यक्ष आणि रिसर्च हेड, नवनीत दमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'वरच्या स्तरावरील सोन्याचे दर काही प्रमाणात नफा दर्शवू शकतात. परंतु, दीर्घ कालावधीसाठी सोन्याच्या गुंतवणूकीमुळे चांगली कमाई होऊ शकते. पुढील १०-१२ महिन्यांत वायदा बाजारात सोनं ५० हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक वाढू शकते. तसंच गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक वाढवू शकतात. डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होऊ शकते. कोरोना व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी उपाय केले गेले नाही तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.'
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होत आहे. कोरोना व्हायरसमुळे सोन्याचे भाव ५०,०००वर जाऊ शकतात. बुलियन मार्केटमधील जाणकारांनुसार, शेअर बाजार आणि रुपयाच्या घसरणीचा फायदा सोन्याला होत आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सध्या ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यानुसार सोनं लवकरच ५० हजार प्रति १० ग्रॅमवरही जाऊ शकतं. सोन्याने गेल्या महिन्यात ४४,००० रुपयांचा आकडा पार केला होता.