दिनेश दुखंडे झी मीडिया, कोची, केरळ : हनन हमीद... केरळमधली एक बिनधास्त मुलगी... सोशल मीडियावर सर्वात चर्चेतला हा चेहरा.....२१ वर्षांची हनन बीएस्सीच्या तिसऱ्या वर्षात शिकते... उंची लहान, पण कीर्ती महान..... कोचीत कोडामंगलमजवळ एका खेड्यात हनन राहते.... घरची परिस्थिती हलाखीची... पण परिस्थितीला हरवत उभं राहायचं आणि शिकायची तिची जिद्द..... मग कधी कुणाच्या घराची झाडलोट कर, कधी चणे विक, मासे विक... असे उद्योग ही हनन करते. अशातही आपल्याला मदत म्हणून मिळालेले दीड लाख तिने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत.
शाळेच्या गणवेषावर मासे विकतानाचा तिचा एक फोटो व्हायरल झाला आणि लोकांनी तिला आर्थिक मदत करायला सुरुवात केली. पण दुसरीकडे हनन सोशल मीडियावर ट्रोलही झाली. हा हननचा सगळा बनाव आहे,हे सगळं ती सहनुभूती मिळवण्यासाठी करते, वगैरे.... वगैरे..... या ट्रोलिंगमुळे हनन खचली आणि मानसिक तणावाखाली गेली.
केरळ सरकारमधले मंत्री अल्फोस कन्नथम या काळात तिच्या पाठीशी उभे राहिले. हननच्या आयुष्यात हे सगळं घडत असताना केरळमध्ये पूर आला आणि एका क्षणात हननं महत्त्वाचा निर्णय घेतला. मदत म्हणून मिळालेले सगळेच्या सगळे दीड लाख तिनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन टाकले आणि टीकाकारांची तोंडं बंद केली. हनन सध्या कोडमंगल शहरातल्या त्रिक्कारियुर गावात विश्वनाथ यांच्या आयुर्वेद संशोधन आणि उपचार केंद्रात राहते.
केरळमधलं सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेतलं व्यक्तिमत्व अशी आता हननची ओळख झाल्यानं ती आता अगदी सेलिब्रिटी झालीय. तुला पुढे जाऊन कोण व्हायचंय असं तिला विचारल्यावर ती क्षणात उत्तर देते 'गुड ह्युमन बिईंग'.