बुरखा घालून परीक्षेला बसायला रोखल्याने तेलंगणामध्ये वाद; गृहमंत्री म्हणतात, "युरोपियन लोकांसारखे कपडे ..."

Hijab Row : हैदराबादमधील एका कॉलेजने विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगितले तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले आहे. जेव्हा महिला कमी कपडे घालतात तेव्हा समस्या उद्भवतात, असे गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 17, 2023, 03:20 PM IST
बुरखा घालून परीक्षेला बसायला रोखल्याने तेलंगणामध्ये वाद; गृहमंत्री म्हणतात, "युरोपियन लोकांसारखे कपडे ..." title=
(फोटो सौजन्य - PTI)

Hijab Row : कर्नाटकात हिजाबचे प्रकरण शांत होत असतानाच शेजारच्या तेलंगणा राज्यातही याचे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. आता हैदराबादमधील (hyderabad) एका महाविद्यालयात विद्यार्थिनींना बुरखा (Burqa) घालून परीक्षेला बसण्यापासून रोखल्याची घटना समोर आली आहे. अर्धा तास वाट पाहिल्यानंतर बुरखा काढूनच परीक्षेला बसू देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. दुसरीकडे याप्रकरणी राज्याचे गृहमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळला आहे. या प्रकरणी आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचे सांगताना त्यांनी महिलांनी लहान कपडे घालू नयेत, हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे, असेही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी हैदराबादमधील केव्ही रंगारेड्डी महिला पदवी महाविद्यालयातील काही विद्यार्थिनी बुरखा घालून परीक्षेला बसण्यासाठी आल्या होत्या. पण महाविद्यालय प्रशासनाने त्यांना आतमध्ये घेतले नाही. परीक्षा देण्यासाठी मुली कॉलेजमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही. बुरखा घातलेल्या सर्व विद्यार्थिनींना बुरखा उतरवल्यानंतरच प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले. तुम्हाला बुरखा काढूनच आत यावे लागेल, परीक्षा संपल्यानंतर तुम्ही तो पुन्हा बाहेर घालू शकता, असेही कॉलेजने सांगितल्याचे मुलींनी सांगितले. मुलींनी आंदोलन करूनही काही उपयोग झाला नाही. सुमारे अर्धा तास वाट पाहिल्यानंतर विद्यार्थिनींना त्यांचे बुरखे काढले  आणि त्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला.

या सर्व वादावर तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. महिलांनी युरोपातील लोकांसारखे कपडे घालू नयेत, त्यामुळे समस्या निर्माण होतात, असे त्यांचे म्हणणे आहे. "आमचे धोरण पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. तुम्हाला हवे ते परिधान करू शकता पण युरोपियन लोकांसारखे कपडे घालू नका, यामुळे गोष्टी बिघडू शकतात. इस्लामला मानणाऱ्या महिला धर्मानुसार कपडे घालतात. हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या महिला पदराने आपले डोके झाकतात. जेव्हा महिला कमी कपडे घालतात तेव्हा समस्या उद्भवतात. तर जेव्हा महिला पूर्ण कपडे घालतात तेव्हा लोकांना बरं वाटते," असे मोहम्मद महमूद म्हणाले.नेमकं काय घडलं?

रंगा रेड्डी महिला पदवी महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी शुक्रवारी उर्दू माध्यमाची पदवी परीक्षा देण्यासाठी बुरखा घालून परीक्षा केंद्रात आल्या होत्या. त्यावेळी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बुरखा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुमारे अर्धा तास त्यांना परीक्षा हॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याने शेवटी परीक्षेला बसण्यासाठी त्यांना बुरखा उतरवावा लागला. एका विद्यार्थिनीने सांगितले की, "महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला उद्यापासून बुरखा न घालण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ते परीक्षेच्या नियमांच्या विरोधात आहे. आमच्या पालकांनी या प्रकरणाची तक्रार गृहमंत्री महमूद अली यांच्याकडे केली आहे."