Hindi Diwas History: मराठी ही आई तर हिंदी ही मावशी असं आपण संबोधतो. या दोन्ही भाषा एकमेंकाच्या हातात हात घालून चालत असतात. असे असताना इंग्रजीच्या वाढत्या प्रवाभाचा दोन्ही भाषांवर परिणाम झाल्याचे दिसते. दरम्यान हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे विधान आपल्याकडे अधूनमधून ऐकायला मिळते. पण हिंदी खरंच आपली राष्ट्रभाषा आहे का? हिंदी दिवसाचा इतिहास काय आहे? हे सर्वकाही जाणून घेऊया. देशभरात दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा प्रसार व्हावा या उद्देशाने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताच्या संविधान सभेने 14 सप्टेंबर 1949 रोजी देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले. अधिकृतपणे पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953 रोजी साजरा करण्यात आला. याशिवाय 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो.
सध्या देशात २२ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे.जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये हिंदीचा तिसरा क्रमांक लागतो. हिंदी ही देशातील आणि जगातील पहिली आणि तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात 70 टक्क्यांहून अधिक लोक हिंदीमध्ये एकमेकांशी संवाद साधतात. तसेच जगभरातील 600 दशलक्ष लोक एकमेकांशी बोलण्यासाठी हिंदी भाषेचा वापर करतात, असेही एका अहवालात म्हटले आहे. हिंदी हा फारसी शब्द हिंद या शब्दापासून बनलेला आहे. हिंदी हे नाव हिंद या पर्शियन शब्दावरून आले आहे. ज्याचा अर्थ सिंधू नदीची जमीन आहे. 11व्या शतकाच्या सुरुवातीला गंगेच्या मैदानावर आणि पंजाबवर आक्रमण करणाऱ्या पर्शियन भाषिक तुर्कांनी सिंधू नदीकाठी बोलल्या जाणाऱ्या भाषेला हिंदी हे नाव दिले, असे सांगितले जाते. 14 सप्टेंबर हा महान हिंदी साहित्यिक व्यावर राजेंद्र सिंह यांचा जन्मदिवस आहे, म्हणून हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतात अनेक भाषा आणि लिपी आहेत पण भारतातील सर्व राज्यांना आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना जोडण्याचे काम हिंदी भाषा करते. जगभरात इंग्रजी भाषेच्या वाढत्या महत्त्वामुळे तुलनेत हिंदीचे प्रचलन कमी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे हिंदीकडे होणारे दुर्लक्ष थांबावे यासाठी देखील हिंदी दिनाचे महत्व आहे.
हिंदी दिवसानिमित्त देशभरात अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये लोक हिंदी साहित्याच्या महान कार्यांचा गौरव करतात. हिंदीचा प्रचार करण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये इंग्रजीच्या जागी हिंदी भाषेचा वापर केला जातो. या दिवशी हिंदीच्या महत्त्वावर चर्चा होते. लोकांना हिंदी भाषेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या दिवशी हिंदीशी संबंधित लोकांना पुरस्कृत केले जाते. शाळा-महाविद्यालयांमध्येही हिंदी दिवसाचे महत्त्व सांगून कार्यक्रम आयोजित केले जातात.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदीला जनमानसाची भाषा म्हटले होते. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी अशी त्यांची इच्छा होती. 1918 मध्ये झालेल्या हिंदी साहित्य संमेलनात त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याची मागणी केली होती. स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेत हिंदीला राजभाषा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याच्या कल्पनेने देशातील विविध राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेषत: दक्षिण भारतीयांनी याला विरोध केला. प्रत्येकाला हिंदी बोलायची असेल तर स्वातंत्र्याचा अर्थ काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. अशा विविध कारणांमुळे हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकली नाही. अधिकृत भाषा असल्याने राज्ये त्यांच्या प्रशासकीय कामकाजासाठी हिंदीचा वापर करतात.