नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे तर नामदार आहे. मी मात्र, गरीब, मागास जातीत जन्मलेला मुलगा आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत मी कशी काय करु शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ते शुक्रवारी संसदेतील अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी मोदींनी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेल्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधींनी आपल्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेक आरोप केले होते. या आरोपांमुळे मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही, असे विधानही राहुल यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मोदींनी म्हटले की, राहुल गांधी हे तर नामदार आहेत, मी कामदार आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत मी करु शकत नाही. गांधी घराण्यातील व्यक्तींच्या नजरेला नजर देण्याची हिंमत करणाऱ्या सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंह सरदार वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आणि शरद पवार या नेत्यांचे काय झाले, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यांच्या तुलनेत तर मी खूप लहान आहे. त्यामुळेच माझ्यासारखा कामदार राहुल गांधींच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत करणार नाही, अशी खोचक टीका मोदींनी केली.