मुंबई : नोटाबंदीनंतर क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तुम्हीही क्रेडिट कार्डने खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. क्रेडिट कार्ड बील वेळेवर न भरल्यास ICICI बँकेने लेट पेमेंट चार्जेस वाढवले आहेत. अनेकदा ग्राहकांना क्रेडिट कार्ड बिल भरण्यास विलंब होतो. आता असे झाले तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. म्हणजेच पेमेंट करण्याबाबत आता तुम्हाला अधिक सतर्क रहावे लागेल. क्रेडिट कार्ड ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेने मेसेज आणि ई-मेलद्वारे याची माहिती दिली आहे.
नवीन शुल्क 10 फेब्रुवारीपासून लागू
मेसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वाढलेले शुल्क 10 फेब्रुवारी 2022 पासून लागू होईल. क्रेडिट कार्डचे पेमेट उशीरा करणे किंवा क्रेडिट कार्डने पैसे काढणे पूर्वीपेक्षा महागणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार क्रेडिट कार्ड जारी करणार्या इतर बँकाही उशीरा पेमेंट करणाऱ्यांवर अधिक शुल्क आकरण्याच्या विचारात आहेत. याबाबत बँकांकडून लवकरच घोषणा अपेक्षित आहे.
100 रुपयांपेक्षा कमी थकबाकीवर शुल्क नाही
बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या मॅसेजनुसार जर तुमची थकबाकी 100 रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला विलंब शुल्क म्हणून कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पण जर तुम्ही यापेक्षा जास्त कर्जाची थकबाकी असेल तर तुम्हाला अधिक विलंब शुल्क भरावे लागेल.
नवीन शुल्क किती?
जर तुमची शिल्लक 100 ते 500 रुपयांच्या दरम्यान असेल, तर उशीरा पेमेंट केल्यास 100 रुपये आकारले जातील.
तसेच 501 ते 5000 रुपयांपर्यंतच्या थकबाकीवर 500 रुपये दंड आहे.
5000 ते 10000 थकबाकी असल्यास, 750 रुपये दंड आहे.
10001 ते 25 हजार पर्यंत शिल्लक रकमेवर 900 रुपये दंड आकारला जाईल.
दुसरीकडे, 25001 ते 50 हजारांपर्यंतच्या थकबाकीसाठी एक हजार रुपये दंड आकारला जाईल आणि त्यापेक्षा जास्त 1200 रुपये दंड आकारला जाईल.
रोख पैसे काढणे खूप महाग
क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढण्यासाठी एकूण रकमेच्या 2.5 टक्के किंवा 500 रुपये यापैकी जे जास्त असेल ते भरावे लागेल.
चेक रिटर्न आणि ऑटो डेबिट रिटर्नच्या बाबतीत, किमान 500 रुपये भरावे लागतील.
थकबाकी 25 हजारांपेक्षा जास्त असल्यास दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय, वरील सर्व शुल्कांवर 50 रुपये + GST स्वतंत्रपणे देय असेल.