Covid-19 Surge In India: देशात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा दहशत दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशातील सक्रीय म्हणजेच अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये वाढली आहे. केंद्र सरकारबरोबर राज्यांमधील सरकारांकडून लोकांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे असं सांगितलं जात आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना लोकांनी मास्कचा वापर करावा असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. काल आणि आज म्हणजेच 9 आणि 10 एप्रिल रोजी मॉक ड्रील करण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालयांमधील तयारीची चाचपणी केली जाणार आहे. असं असतानाच भारतीय मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएने देशातील कोरोना वाढीमागील 3 कारणांचा खुलासा केला आहे.
आयएमएने देशातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचं म्हटलं आहे. आयएमएने कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यामागील कारणांबद्दल सांगताना पहिलं कारण हे लोकांकडून कोरोनासंदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं आहे असं म्हटलं. तसेच देशातील कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली असून हे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यामागील प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच नवीन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं भारतामधील या आघाडीच्या आरोग्य विषयक संस्थेचं म्हणणं आहे. मागील काही दिवसांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारकडून राज्यांना वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. तसेच बैठकींचं सत्रही सुरु झालं आहे. वेळीच चाचण्यांची संख्या वाढवली नाही, लोकांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करणं गांभीर्याने घेतलं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची आणि परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील 24 तासांमध्ये देशात कोरोनाचा नव्याने संसर्ग झालेल्या 5,880 रुग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची संख्या 4 कोटी 47 लाख 62 हजार 496 वर पोहोचली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या 35 हजार 199 इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज म्हणजेच 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 वाजता ही आकडेवारी जारी केली आहे. मागील 24 तासांमध्ये दिल्ली आणि हिमाचलमध्ये प्रत्येकी 4 तर महाराष्ट्र, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये प्रत्येकी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशामध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 5 लाख 30 हजार 979 वर पोहोचली आहे.
देशातील 35 हजार 199 लोकांवर सध्या कोरोनासंदर्भातील उपचार सुरु आहेत. ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 0.8 टक्के इतकी आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 98.73 टक्के इतकी आहे. देशामध्ये संसर्गाचा दैनंदिन दर हा 6.91 टक्के इतका आहे. तर आठवड्याच्या दृष्टीने विचार केल्यास हा दर 3.67 टक्के इतका आहे. देशातील 4 कोटी 41 लाख 96 हजार 318 जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.