Junk Picker Donated 35 Lakhs: वरील फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव फकीरचंद असं आहे. फकीरचंद रद्दी आणि भंगाराचा व्यवसाय करतात. त्यांची दैनंदिन कमाई आहे केवळ 600 ते 700 रुपये. मात्र आपल्या कमाईपैकी जवळजवळ 90 टक्के रक्कम फकीरचंद दान करतात. त्यांनी आतापर्यंत तब्बल 35 लाख रुपये समाजकार्यासाठी दान केले आहेत. फकीरचंद हे स्वत: अविवाहित आहेत मात्र त्यांनी अनेक गरीब आणि गरजू मुलींची लग्न लावून दिली आहेत. फकीरचंद यांच्या कार्याची दखल आता त्यांच्या राज्यातील अनेक शहरांमध्ये. या माणसाचं नाव फकीरचंद असलं तरी तो मनाने फार श्रीमंत आहे, असं स्थानिक लोक सांगतात.
हरियाणामधील कैथलमध्ये राहणारे 53 वर्षीय फकीरचंद त्यांच्या समाजसेवेसाठी ओळखले जातात. शहरातील अर्जुन नगरमधील खनौरी रोड बायपासवरील गल्ली नंबर-1 मध्ये फकीरचंद यांचं घर आहे. फकीरचंद यांच्या घरात एकच रुम आहे. मात्र या छोट्या रुमममध्ये राहूनही फकीरचंद यांनी कधी स्वत:चा विचार केलेला नाही. फकीरचंद हे फार बेसिक फोन वापरतात. घरात एक फॅन, एक मोठी पेटी आणि काही भांडी असा त्यांचा संपूर्ण संसार आहे. घरातील भिंतींवर अनेक देवीदेवतांचे फोटो लावलेले आहेत. मृत्यूपूर्वी आपण ही खोलीही दान करणार असून ते पैसे सुद्धा समाजकार्यासाठी वापरायला देणार आहे असं ते सांगतात.
मला एकूण 5 भावंडं होती. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून मी एकटाच जिवंत आहे. मी अविवाहित आहे असं फकीरचंद सांगतात. भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व कौटुंबिक संपत्ती मलाच मिळाली. मी त्या संपत्तीच्या जीवावर आरामात जगू शकलो असतो. सर्व सुखसोयी मला विकत घेता आल्या असत्या. मात्र मला स्वत:च्या कष्टाने कमवून आपण खाल्लं पाहिजे असं वाटतं. मी मेहन केली तरच माझं शरीर मला साथ देईल. मी आता केलेल्या पुण्याचं फळं मला कदाचित पुढल्या जन्मात मिळेल असंही फुलचंद मस्करीत म्हणतात.
मागील 25 वर्षांपासून फकीरचंद भंगार आणि रद्दी विकण्याचं काम करत आहे. ते स्वत: एकटेच आपल्या दुकानात काम करतात. त्यामुळेच भंगार, रद्दी आणायला जाणे, ती वेगळी करणे, विकणे हे सारं ते एकटेच करतात. दिवसाला 600 ते 700 रुपये कमाई करणारे फकीरचंद काही ठरावीक दिवसांनी पैसे बँकेत जमा करतात. बँके खात्याच्या माध्यमातूनच ते वेगवेगळ्या संस्थांना ही रक्कम दान करतात. फकीरचंद हे या पैशांमधून गरजू आणि गरीब मुलींची लग्न लावून देण्यासाठीही मदत करतात. त्यांनी आतापर्यंत 5 मुलींच्या लग्नाचा खर्च उचलला असून प्रत्येक मुलीला संसार थाटण्यासाठी 75 हजार रुपयांचं घरगुती सामानही दिलं आहे.