बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांची नात सौंदर्या (Soundarya) हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह बेंगळुरूमधील तिच्या निवासस्थानी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
सौंदर्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये
बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या 30 वर्षांची होती आणि ती व्यवसायाने डॉक्टर होती. सौंदर्या मध्य बंगलोरमधील तिच्या फ्लॅटमध्ये राहत होती आणि तिला चार महिन्यांचं बाळ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती नैराश्यात (Depression) होती असं सांगण्यात येत आहे.
सौंदर्याने आत्महत्या केली?
सौंदर्या ही बीएस येडियुरप्पा यांची मोठी मुलगी पद्मावती (BY Padmavati) ची मुलगी आहे. सौंदर्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सौंदर्याचा विवाह 2019 मध्ये डॉक्टर नीरजसोबत झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
खोलीत सौंदर्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत
आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरातील नोकराने खोलीचा दरवाजा ठोठावला. पण खोलीतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी सौंदर्याचे पती डॉ.नीरज यांना फोन केला. यानंतर नीरजने दरवाजा उघडला तेव्हा त्यांना बेडरुममध्ये सौंदर्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.