केदारनाथ यात्रेला जात असाल तर या चुका टाळा, होऊ शकतं मोठं नुकसान

केदारनाथ यात्रेला जाण्याआधी ही बातमी पाहा, तुमच्यासाठी महत्त्वाची 

Updated: May 29, 2022, 12:57 PM IST
केदारनाथ यात्रेला जात असाल तर या चुका टाळा, होऊ शकतं मोठं नुकसान title=

मुंबई : बाबा केदारनाथाच्या दर्शनासाठी अनेक भाविक सध्या यात्रेला जात आहेत. उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामला जाताना अनेक भाविक छोट्या छोट्या चुका करतात. ज्यामुळे त्यांना ही यात्रा महागात पडते. तुम्ही जर केदारनाथ यात्रेला गेला असाल किंवा जाण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ आहे. त्याच्या दर्शनासाठी भाविक कित्येक महिने आधीपासून तयारी करत असतात. काहीतरी उद्देशाने ही यात्रा सुफल संपन्न व्हावी असं म्हटलं जात होतं. यावेळी पवित्र धाम केदारनाथाचे दरवाजे 3 मे रोजी उघडण्यात आले. त्यामुळे यावेळी भाविकांनी केदारनाथला जाण्यासाठी गर्दी केली. 

केदारनाथला जाणारे भाविक कधीकधी चुका करतात. त्यामुळे मोठं नुकसान होतं. काहीवेळा जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे या काही चुका टाळल्या तर केदारनाथ यात्रा खूप चांगली पूर्ण होऊ शकते असं म्हटलं जातं. 

-केदारनाथ मंदिर हिमालयाच्या कुशीत आहे. त्यामुळे तिथल्या हवामानाचा आढावा आधी घेणं आवश्यक आहे. पावसात केदारनाथला जाऊ नये. भूस्खलन होण्याचा धोका अधिक असतो. त्याच बरोबर अनेक समस्याही निर्माण होऊ शकतात. 

-तुम्ही जर एका दिवसात केदारनाथ मंदिराचं दर्शन घेऊन परतण्याचा विचार करत असाल तर ही चूक करू नका. तिथे तुम्ही सकाळी लवकर निघून दर्शन घेऊन एक दिवस राहायला हवं. दुसऱ्या दिवशी गौरीकुंडासाठी रवाना व्हावं. 

- जरी उन्हाळ्याच्या सुट्टीत केदारनाथची यात्रा केली तर तुम्हाला थंडी तिथे अनुभवता येते. त्यामुळे उबदार कपडे आणि आवश्यक ती औषध सोबत ठेवावीत. दम्याचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

- हार्ट पेशंट असणाऱ्यांनी डोंगरावर जाणं टाळावं. खूप जास्त उंचीवर गेल्याने ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. त्यामुळे श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. जर अशा व्यक्तीला सोबत घेऊन जायचं असेल तर सगळ्या तयारीने आणि डॉक्टरांच्या परवानगीने जावं.