श्रीनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मनोज सिन्हा आता जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल असतील. गिरीशचंद्र मुर्मू यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मनोज सिन्हा यांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपती भवनातर्फे करण्यात आली आहे.
5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आहे, दरम्यान बुधवारी संध्याकाळी जीसी मुर्मू यांच्या राजीनाम्याची अचानक बातमी समोर आली. मुर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला.
आता नव्या एलजीची जबाबदारी मनोज सिन्हा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर हे पूर्ण विकसित राज्य असताना सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते, परंतु केंद्रशासित प्रदेश स्थापन झाल्यावर अधिकारी जी.सी. मुर्मू यांना तेथे पाठविण्यात आले होते. जीसी मुर्मू यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये गणना केली जाते.
मनोज सिन्हा गाझीपूरचे माजी खासदार होते आणि ते उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचा एक मोठा चेहरा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. मनोज सिन्हा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री राहिले आहेत आणि त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती.
जेव्हा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळविला, तेव्हा मनोज सिन्हा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. पण योगी आदित्यनाथ यांना पक्षाने पुढे केले. मनोज सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. अशा परिस्थितीत मनोज सिन्हा यांना पुन्हा एकदा केंद्र सरकारने नवी जबाबदारी दिली आहे.