नवी दिल्ली: भारतीय सरकारी हवाई सेवा देणारी कंपनी एअर इंडियाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचारविमर्श करण्यात आला. एअर इंडियाला आर्थिक अरिष्ठातून बाहेर काढण्यासाठी सरकार कंपनीला विशेष आर्थिक पॅकेज देण्यावर विचार करत असतानाच ही बैठक पार पडली आहे. त्यामुळे या बैठकीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक पॅकेज देताना कंपनीवर असलेले कर्ज सरकारकडून माफ केले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळात दोन स्वतंत्र संचालक आयटीसीचे संचालक वायसी देवेश्वर आणि आदित्य बिर्ला समूहाचे संचालक कुमार मंगलम बिर्ला यांचा समावेश केल्यानंतर ही बैठक पार पडली आहे. त्यामुळेही या बैठकीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायसी देवेश्वर या बैठकीस सहभागी झाले. मात्र, बिर्ला या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, या बैठकीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही.